सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १९ (बिनविषारी साप) नानेटी (Bugfstriped/ striped keelback) - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १९ (बिनविषारी साप) नानेटी (Bugfstriped/ striped keelback)

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १९ (बिनविषारी साप) नानेटी
                 नानेटी ( Bugfstriped/ striped keelback) 

भरतात सर्वत्र आढळणारा हा एक बिनविषारी  साप आहे. हा कोल्युब्रिडी सर्पकुलाच्या डिप्सॅडोमॉर्फिनी उपकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव डेन्ड्रेलॅफिस ट्रिस्टिस आहे.  याच्या लांब आणि निमुळत्या शेपटी मुळे इंग्रजीत त्याला व्हिप स्नेक असेही म्हणतात. 
          नानेटी सापांची लांबी अर्धा ते एक मीटर  असून शेपूट शरीराच्या एक तृतीयांश असते. रंग बदामी, तपकिरी असून हिरवट झाक असते. डोक्यापासून शेपटापर्यंत   पाठीवरून गेलेले पट्टे असतात. अंगावरील मुख्य पट्टा काळपट, तपकिरी असतो. पोटाकडील बाजू पिवळसर असते. डोके काहीसे चपटे, डोळे मोठे व वरचा ओठ पिवळा असतो. प्रौढ नानेटी आणि पिले सारखीच दिसतात. याची मादी एकावेळी ६-७  लांबट आकाराची अंडी घालते. ४-६ आठवड्यांनी अंड्यांमधून पिले बाहेर येतात. जन्मलेली पिले साधारणत: १५ सेंमी. लांब असतात.
          नानेटी बहुधा झाडे-झुडपे, कुरणे, भात शेतीच्या कडेने, बागा, कित्येकदा घराजवळील झाडांच्या कुंडीतही आढळतो. भक्ष्याच्या शोधात बऱ्याच वेळा गवताच्या व कौलांच्या छपरा मध्ये सुद्धा दिसतो. हा साप दिनचर असून उन्हाळ्यात अत्यंत चपळपणे हालचाली करतो. झाडावर तो वेगाने चढतो. धोक्याची जाणीव झाल्यानंतर मान आणि शरीराचा पुढील भाग विशिष्ट पद्धतीने हलवतो. त्यास पकडल्यास चावण्याचा प्रयत्न करतो. झाडे व घरांच्या छपरावरुन तो सहजपणे खाली उडी मारतो. धोका दिसल्यानंतर लपून राहण्याचा प्रयत्न करत नाही. लहानसहान पक्षी आणि सरडे हे त्याचे मुख्य अन्न आहे. कोकणात केंबळ्याने शाकारलेल्या घराच्या छतांमधील पाली व उंदीर पाठलाग करून खातो. या सापाच्या लाळेत विष असते. लहान प्राण्यांवर या विषाचे घातक परिणाम होतात; परंतु माणसाला याच्या दंशामुळे फारशी विषबाधा होत नाही.


माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

*शब्दांकन/संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२



No comments:

Post a Comment