सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २२ (बिनविषारी साप) पाण दिवड/वेरुळा (Water Snake) - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २२ (बिनविषारी साप) पाण दिवड/वेरुळा (Water Snake)

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २२ (बिनविषारी साप) पाण दिवड/वेरुळा (Water Snake)
पाण दिवड /वेरुळा (Pond snake/Checkered keelback /Water Snake/)
       पाण दिवड हा प्रामुख्याने गोड्या पाण्यात राहणारा, भारतात सर्वत्र आणि सहज दिसणारा एक बिनविषारी साप आहे. याचा समावेश कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी या उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव झिनोक्रोपीस पिस्केटर आहे. बुध्दीबळ पटासारख्या याच्या अंगावरील नक्षीमुळे याचे इंग्रजी नाव Checkered keelback water snake पडले असावे. त्याला विविध भागात पाणदिवड, वेरुळा, पाण्याळी, पाणसाप, पानली बोकड, पाण घणस किंवा विरोळा असेही म्हणतात. भारतात तो भातशेती, तलाव, डबके, नद्या, नाले, ओढे, विहिरी, गावात किंवा गावालगत नेहमी पाणी असणाऱ्या पाण वनस्पती युक्त गटारी आदी पाणथळ जागी आढळतो.

                                                                                         जाहिरात
                                                                                    जाहिरात

          पूर्ण वाढ झालेल्या पाणदिवडाची सरासरी लांबी एक ते दीड मीटरपर्यंत असते. या सापाचा रंग करडा, तपकिरी, पिवळा किंवा हिरवट तपकिरी असतो. शरीरावर चार ते सहा रांगांमध्ये  काळे/काळपट चौकोनी ठिपके असतात. पोटाकडील भाग पिवळा किंवा पांढरा असतो. डोके त्रिकोणाकृती, डोळे मोठे, शेपटी लांब असून शरीराच्या लांबीच्या एक-तृतीयांश असते. शेपटीला धरुन याला पकडण्याचा प्रयत्न केला तर धडपडत पालीसारखा शेपटी तोडून घेऊन पळून जातो.
          दिवड अतिशय चपळ, तापट व क्रुर स्वभावाचा आहे. पाण्यात व पाण्याबाहेर जराही डिवचले तरी जोरात हल्ला करतो किंवा चावतो. (म्हणून याला चावरा साप असेही म्हणतात.) यावेळी नागासारखी मान वर व चपटी करतो.  मासे, बेडूक,पाणकिडे आदी याचे खाद्य आहे. दिवसा आणि रात्रीही तो संचार करतो. उन्हाळा व हिवाळ्यात तो सुप्तावस्थेत जातो. हल्ल्याच्या वेळी तो उग्र वास सोडतो. याचा जबडा मोठा असल्याने चाव्याची जखमही मोठी असते. चावलेल्या ठिकाणी थोडा वेळ वेदना होतात. पण हा साप पूर्ण बिनविषारी असल्याने कुठलाही धोका नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नये. हा पाण्यात चावला तर विषबाधा होत नाही पण पाण्याबाहेर चावला तर विष चढते असाही गैरसमज आहे.
            याची मादी उंदरांची बिळे, वाळवीची वारुळे, विहिरीच्या भिंतीतील भोके, तलावाकाठचे खळगे यांत एका वेळी २५ ते ४० अंडी घालून अंड्यांचे रक्षण करते व उबविते. अंड्यांतून ६०–७० दिवसांनंतर पिले बाहेर पडतात.

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment