स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी कालकुंद्रीतून ५ हजार शेणी, २ टन लाकडे रवाना - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2020

स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी कालकुंद्रीतून ५ हजार शेणी, २ टन लाकडे रवाना

कालकुंद्री ग्रामस्थांनी जमा केलेली लाकडे,शेणी टेम्पो भरून नगरपालिका स्मशानभूमीकडे रवाना केली. त्यावेळी छ. शिवाजी महाराज चौकात जमलेले कार्यकर्ते.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
         कोरोना मुळे गडहिंग्लज उपविभागासह कोल्हापूर जिल्ह्यात मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा ताण महानगरपालिका, नगरपालिकेच्या स्मशानभूमीवर पडत आहे. अंत्यसंस्कारासाठी शेणी, लाकडे मिळेनाशी झाली आहेत. लाकडे कुठून तरी आणता येतील पण शेणी मिळणे अशक्य झाले होते. यामुळे गडहिंग्लज नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शेणी, लाकडे दान करण्याचे आवाहन करताना गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातील ग्रामीण भागाने यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कालकुंद्री ता. चंदगड येथील कोरोना दक्षता कमिटी, तंटामुक्त कमिटी, ग्रामपंचायत प्रशासन, सर्वपक्षीय कार्यकर्ते, संस्था व गल्लीवार तरुणांनी गावात फिरून शेणी, लाकडे जमा केली व तिन टेम्पो भरून साहित्य संबंधित स्मशानभूमीकडे रवाना केले. कालकुंद्री ग्रामस्थांच्या या संवेदनशीलतेचे परिसरात कौतुक होत असून हा आदर्श इतर गावांना प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा आहे. 

No comments:

Post a Comment