नागवे व उमगाव परिसरात हत्तींकडून धुडघूस, हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त, शेतकरी हवालदिल - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2020

नागवे व उमगाव परिसरात हत्तींकडून धुडघूस, हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त, शेतकरी हवालदिल

हत्तींनी लोळून भातपिकांचे केलेले नुकसान
चंदगड / प्रतिनिधी
        चंदगड तालुक्यात गेल्या महिनाभरापूर्वी आगमन झालेल्या जंगली हत्तींचा कळप तालुक्यातील उमगाव, नागवे, खालसा गुडवळे, खामदळे, हेरे व वाघोत्रे येथे स्थिरावला आहे. काल व आज हत्तींच्या कळपाने नागवे व उमगाव परिसरात उच्छाद मांडला. हत्ती दिवसा जंगलात मुक्काम करून रात्रीच्या वेळी जंगला बाहेरील लगतच्या शेतशिवारात हत्तीच्या कडून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत आहेत. 
हत्तींनी जमीनदोस्त केलेले भातपिक
        तालुक्यातील शेत शिवारात सध्या पोटरीला आलेले भातपीक, पूर्ण वाढ झालेला ऊस, नाचणी या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हत्तींचा कळप भात आणि ऊस पिकांचे शिवारात घुसून खाऊन, तुडवून, लोळवून मोडतोड करून नुकसान करत आहे. आज हत्तींच्या कळपाने उमगाव पैकी सावंतवाडी, धुऱ्याचीवाडी येथील तुकाराम नागोजी गावडे,  मोहन ज्ञानदेव गावडे, चंद्रभागा सखाराम गावडे, मारुती बाळा सावंत, पांडुरंग बारकू रेडकर, भिवा कृष्णा गावडे, मारुती बाहुबली गावडे, अर्जुन बाळु सावंत, रामभाऊ तुकाराम धुरी, एकनाथ धुरी, पांडूरंग धुरी, श्री जांबरेकर या शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्तीकडून नुकसान झाले. वनपाल डी. जी. पाटील, वनरक्षक श्रीमती घोरपडे, वनमजूर गुंडी देवळी व नितीन नाईक यांच्या पथकाने उमगाव, नागवे भागात भेट देवून धुरीवाडी, सावताचीवाडी येथील गवा आणि हत्तीकडून झालेल्या पिकनुकसानीची पाहणी करुन पिकांचे पंचनामे केले. 
पिकांचा पंचनामा करताना वनविभागाचे अधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी. 
           वन विभागाकडून धुऱ्याचीवाडी हेरे, जांबरे, खालचा गुडवळे येथे हत्ती नेहमी येणाऱ्या वाटावर जंगलांच्या दिशेने मधमाशांचे आवाज करणारे स्पीकर बसविण्यात आले आहेत. हत्तीच्या कळपाला जंगल क्षेत्रात रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. हत्तीच्या कळपास रोखण्यासाठी व त्यावर पाळत ठेवण्यासाठी चार कर्मचाऱ्यांचे गस्त पथक तयार करण्यात आले आहे. गस्त पथकाला फटाके, सुरबाण, मेगाफोन देण्यात आले आहेत. परंतु सध्या असलेले पावसाळी वातावरण आणि दाट धुके अडचणींच्या वाटा, यामुळे गस्त पथकाला वनहत्तींना  हुसकावून लावणे व पिकात उतरण्यापासून रोखण्यासाठी कठीण बनले असल्याचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment