कोरोनाची साखळी तोडण्यासाठी `माझे कुटुंब, माझी जबाबदारी` मोहिमेला नागरीकांनी सहकार्य करावे – आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2020

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी `माझे कुटुंब, माझी जबाबदारी` मोहिमेला नागरीकांनी सहकार्य करावे – आमदार राजेश पाटील

चंदगड तहसिल कार्यालयात आयोजित बैठकीत माहीती देताना तहसिलदार विनोद रणवरे. सभापती ॲड. अनंत कांबळे, आमदार राजेश पाटील, नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे.
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
             राज्यासह ग्रामीण भागातील कोविड रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ट्रेक, ट्रॅक व ट्रीट या त्रिसुत्रीचा वापर करुन साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपुर्ण राज्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी हि मोहिम 15 सप्टेंबर ते 25 आक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला नागरीकांनी सहभाग घेवून सहकार्य करावे व कोविडची साखळी तोडण्यास मदत करावी असे आवाहन चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले. चंदगड येथील तहसिल कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. 
             आमदार श्री. पाटील पुढे म्हणाले, ``कोरोनाला भिऊन लोक लक्षणे लपवत आहेत. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेनदिवस वाढत आहे. नागरीकांनी अफवांना बळी न पडता. लक्षणे जाणवल्यास उपचारासाठी पुढे यावे. गावा-गावातील प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण, तपासणी व उपचार केले जाणार आहेत. स्थानिक पातळीवर सरपंच, सेवाभावी संस्था व अन्य सामाजिक संस्था यांनी पुढे येवून या मोहिमेत सहभाग दर्शवावा. मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत.``
             तहसिलदार विनोद रणवरे म्हणाले, ``चंदगड तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 87 हजार असून यामध्ये 156 गावे आहेत. या प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील व्यक्तीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. कोविड -19 च्या अनुषंगाने सर्वांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. अति जोखमीच्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांची तपासणी व उपचार तसेच प्रत्येक नागरीकाला आरोग्याबाबत जागरुक केले जाणार आहे.``
             तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत म्हणाले, ``चंदगड तालुक्यामध्ये आतापर्यंत 746 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 557 जणांना डिस्चार्ज दिला असून 154 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 25 जण कोरोनामुळे मयत झाले आहेत. `माझे कुटुंब, माझी जबाबदारी` मोहिमेअंतर्गत आशा, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, स्वयंसेवक यांची सर्वेक्षणासाठी नियुक्ती केली आहे.``
             यावेळी तपासणी यंत्रणेला स्थानिक नागरीक व पदाधिकारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी सांगितले. पंचायत समिती सभापती ॲड. अनंत कांबळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामु पारसे, चंदगडच्या नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांनीही चर्चेत भाग घेतला. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता ए. एस. सावळगी यांनी आभार मानले. No comments:

Post a Comment