चंदगड तालुक्यात जनता बंदला उस्फुर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2020

चंदगड तालुक्यात जनता बंदला उस्फुर्त प्रतिसाद

नेहमी गजबजलेल्या पाटणे फाट्यावर कोरोनाच्या धास्तीने आज पुन्हा सामसूम होती.
चंदगड / प्रतिनिधी
           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  चंदगड तालुक्यात नागरिकांनी  स्वतःहून १०ते १७ सप्टेंबर अखेर पाळलेल्या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला . सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले. चंदगड, तुर्केवाडी, माणगाव अडकुर,  हेरे, तिलारी नगर, कोवाड, हलकर्णी, पाटणेफाटा, शिनोळी, कानूर,नागनवाडी  या मोठया गावांच्या बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या होत्या.
            पोलीस व्हॅन आणि आरोग्य खात्याची रुग्णवाहिका अश्या अत्यावश्यक सेवा वगळता एकही वाहन धावताना दिसत नव्हते. सतत धावणाऱ्या  वाहनांच्या  कर्ण-  कर्कश आवाजांनी बेजार झालेल्या नागरिकांनी आज पुन्हा  दिवसभर प्रदूषण आणि कानठळ्या बसवणाऱ्या हॉर्न आवाजातून  सुटका मिळाली. 
           कोरोनाच्या धास्तीने  गावे निर्मनुष्य झाली होती. शेतकऱ्यांनीही आपल्या कुटुंबासमवेत  घरीच  राहणे पसंत केले. धावपळ आणि दगदगीच्या रोजच्याच जीवन चक्राने आज साऱ्यांनाच पुन्हा एकदा घरी बसवलं.  शेजारी- पाजारीही एकमेकांच्या घरी गेल्याचे दिसत नव्हते. चंदगड शहरातील रस्ते ओस पडले होते. बेळगाव- वेंगुर्ला राज्यमार्ग, तसेच तिलारी- गोवा मार्ग आणि तालुक्यातील गावा- गावांना जोडणारे रस्ते  आज दिवसभर निर्मनुष्य दिसत होते. 
         चंदगड पोलिसांनी चंदगड शहरासह गावातून कडक बंदोबस्त ठेवला होता. चंदगड शहरातील छ.  संभाजी चौक, गुरुवार पेठ, कैलास कॉर्नर, कॉलेज रोडवर शुकशुकाट होता. एस. टी. स्टँड परिसर, कोर्ट, तहसिल आणि पोलीस ठाणे येथेही दिवसभरात कोणीही फिरकले नाहीत.  महामार्गाला संलग्न असणाऱ्या सर्वच   रस्त्यावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे जनता कर्फ्यूला अधिकच  प्रतिसाद मिळाला. चंदगडचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते  व  त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यातील प्रमुख  मोठया बाजारपेठा असलेली गावे,  व  मोठ्या गावातील  छोटे-मोठे व्यवसायिक ते उद्योजकानी प्रतिसाद  देत दैनंदिन व्यवहार बंद ठेवले. 

No comments:

Post a Comment