सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३३ - सापांच्या विषाची वर्गवारी आणि दंशाचे परिणाम - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३३ - सापांच्या विषाची वर्गवारी आणि दंशाचे परिणाम

           सापांच्या विषाची वर्गवारी आणि दंशामुळे होणारे परिणाम 
घोणस सापाच्या जबड्यातील वरचे विषारी दात.
         माणसाला होणारे सर्पदंश हे ७० ते ७५ टक्के बिनविषारी असले तरी जे २५-३० टक्के विषारी सापाचे दंश होतात त्यातील ९५ टक्के पेक्षा जास्त सर्पदंश नाग, मण्यार, घोणस या सापांचे झाल्याचे आढळून येते. यापैकी नाग आणि मण्यार या सापांचे विष न्युरोटॉक्झिक  (मज्जासंस्थेवर परिणाम करणारे) असते. तर घोणस फुरसे यांचे विष हिमोलॅटिक प्रकारचे  (रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे असते).
 १)न्युरोटॉक्झिक / कॉर्डिओटॉक्सिक (neurotoxic/ cardiotoxic) विष 
          नाग सापाचा दंश झाल्यास दंशाच्या जागी सूज येऊ लागते. शरीर जड होते.  ग्लानी आल्यामुळे हात-पाय गळाल्यासारखे वाटतात. तोंडातून लाळ गळणे, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडातून फेस येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशी लक्षणे दिसतात. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप अनियंत्रित होते. मळमळ, उलट्या होणे, अंगाला घाम फुटणे, जीभ जड झाल्यामुळे बोलता न येणे, पदार्थ, पाणी गिळण्यास त्रास होतो. दातखिळी बसू शकते.
        मण्यार सापाचे विष नागापेक्षा जहाल असते. मण्यारच्या विषाचे दात लांबीला कमी असले तरी विष नागाच्या विषापेक्षा तीव्र असते. बरीच लक्षणे नागाच्या विषासारखीच असतात. फक्त दंश झालेल्या ठिकाणी वेदना जळजळ किंवा सूज कमी प्रमाणात असते. पण काही वेळात पोटात आणि सांध्यांत अतिशय वेदना होऊ लागतात. 
      नाग आणि मण्यार सापांचे विष मज्जासंस्थेवर थेट परिणाम करत असल्यामुळे रुग्णाचे चालणे, बोलणे इत्यादी सर्व प्रकारच्या हालचाली अनियंत्रित किंवा बंद होत जातात.
२) हिमोलॅटिक- (hemolytic/ vasculotoxic) घोणस, फुरसे, चापडी या सापांचे विष या प्रकारातील असते. 
       घोणसचे समोरचे दात नागापेक्षा आकाराने मोठे असतात. याच्या दंशामुळे काही मिनिटातच दंशाच्या जागी जळजळ व वेदना सुरू होतात. जखमेवर सूज येऊन अवयव लाल होतो. रक्त गोठून ठेवणाऱ्या प्रथिनांचा नाश करते. त्यामुळे ते पातळ होऊन जखमेतून अधिक प्रमाणात वाहू लागते. तसेच लघवी लघवीतून, हिरड्या, नाक, कान, गुदद्वार यातूनही वाहू/पाझरू शकते. जळजळ वाढत जाते.
     फुरसे हा साप दिसायला घोणससारखा असला तरी आकाराने लहान असतो. मात्र त्याचे विषाचे दात शरीराच्या मानाने लांब असतात. याच्या विषाची लक्षणे घोणस सारखीच असतात. दंशाच्या जागी जळजळ होऊन ती अंगभर वाढत जाते. हळूहळू रुग्णाची ताकद कमी होऊन अशक्तपणा येतो. हिरवी चापडी किंवा चापडा सापाच्या विषाची लक्षणे याच प्रकारात मोडतात.
       विषारी सापाचा दंश झालेला असल्यास त्याच्या पुढील मोठ्या दोन दातांच्या खुणा दंशाच्या ठिकाणी स्पष्ट दिसतात. तर बिनविषारी सापांच्या दंशाच्या ठिकाणी सर्व दातांच्या खुणा समान प्रकारच्या दिसतात. सर्पदंश झाल्यानंतर प्रथमोपचार होताच anti venom इंजेक्शन उपलब्ध असलेल्या (आहे याची खात्री करून) हॉस्पिटलमध्ये तात्काळ हलवावे. नेताना रुग्णाच्या शरीराची जास्त हालचाल होणार नाही याची खबरदारी घ्यावी.



माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment