धबधब्यात पडून पर्यटकाच्या मृत्यूनंतरही धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, किटवाड येथील स्थिती, पोलीसांसमोर आव्हान - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2020

धबधब्यात पडून पर्यटकाच्या मृत्यूनंतरही धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, किटवाड येथील स्थिती, पोलीसांसमोर आव्हान

पर्यटकांचे आकर्षण असलेली किटवाड धबधब्यानजिक धरणाच्या सांडव्यातील झिगझॅग भिंत.

कोवाड : सी एल  वृत्तसेवा 

        किटवाड (ता. चंदगड) येथील धबधबा व धरण पाहण्यासाठी बेळगाव चंदगड तालुक्यातून पर्यटकांची गर्दी उसळत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीचा त्रास किटवाड परिसरातील कालकुंद्री, होसूर, कुदनुर आदी गावांतील शेतकऱ्यांना होत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर बंदी असूनही वाढणारी गर्दी पोलीस प्रशासनाने रोखावी अशी मागणी होत आहे.

          मागील आठवड्यात याच धबधब्यात पडून बेळगाव रेल्वे स्टेशनवर कार्यरत चेन्नई येथील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पर्यटकांची गर्दी कमी होईल असा ग्रामस्थांचा अंदाज होता. तथापि सद्यस्थितीत उलटे चित्र दिसत असून घटनेनंतर पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. किटवाड परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने थांबवण्यासाठी सुद्धा जागा मिळेनाशी झाली आहे; इतकी गर्दी वाढली आहे. सध्या किटवाड ग्रामपंचायत वर प्रशासकीय कारभार असल्यामुळे  ग्रामपंचायत चे या बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. तर कोवाड पोलीस ठाण्याकडे असणाऱ्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे येथे नियमित बंदोबस्त ठेवणे पोलीस प्रशासनासमोर आव्हान ठरले आहे. ८ सप्टेंबर पासून येथे येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तसे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. हे सगळे उपाय कुचकामी ठरत आहेत. पर्यटकांकडून नजीकच्या शिवारात तसेच जनावरांच्या कुरणात दारूच्या बाटल्या फेकणे, फोडणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. याला कसा आवर घालावा या विवंचनेत किटवाड ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी असून पर्यटकांनी निदान यावर्षी तरी इकडे येऊ नये असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.  

No comments:

Post a Comment