वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३१ : सर्पदंश कसे टाळावेत - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३१ : सर्पदंश कसे टाळावेत

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३१  : सर्पदंश कसे टाळावेत.
विषारी साप मण्यार
सर्पदंश होऊ नये किंवा साप घराच्या आसपास येऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी

१) सापांचे प्रमुख आणि आवडते अन्न म्हणजे उंदीर आहे. हे ओळखून घराच्या व कंपाऊंडच्या भिंतींना उंदीर वास्तव्य करतील आशी भोके/बिळे बुजवून नष्ट करावीत. कारण अशा ठिकाणी उंदरांच्या शोधात साप येण्याची शक्यता अधिक असते.
 २) घराजवळ पालापाचोळा, कचऱ्याचे ढीग, दगड विटांचे ढिगारे, लाकडांचा साठा ठेऊ नये.
 ३) घरांच्या खिडक्या, दरवाजे किंवा भिंती यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अशी झाडेझुडपे वेळच्यावेळी तोडून साफ करावी.
 ४)जळण, गोवऱ्या, लाकडे घरालगत किंवा घरात न ठेवता घरापासून काही अंतरावर पण जमिनीपासून उंचीवर ठेवावीत.
५)वापराच्या वेळी गोवऱ्या लाकडे काढताना सावधगिरी बाळगावी.
६) घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.
७) गवतातून चालताना पायात बूट/गमबुट असावेत. 
८) रात्रीच्या वेळी घराबाहेर अंधारात जाताना हातात उजेडासाठी बॅटरी असावी. कारण काही निशाचर साप रात्रीच्यावेळी भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडलेले असतात. 
९) रात्री शक्यतो अंगणात / घरात जमिनीवर झोपू नये. 
१०) जमिनीवर झोपायचेच असेल तर भिंतीलगत अंथरुण न  घालता काही अंतर सोडावे. कारण साप भिंतीच्या कोपऱ्यातून जाणे पसंत करतात.
११) आपल्यासमोर जर अचानक साप आला तर घाबरून न जाता  आपल्याजवळ असेल ती वस्तू (पर्स, पिशवी, इ.) सापाच्या बाजूला फेकावी म्हणजे साप तिकडे आकर्षित होतो आणि तेवढ्या वेळात आपण बाजूला जाऊ शकतो.
 १२) साप घरात आल्यास घाबरून गोंधळ न घालता संयम राखावा. त्याला न मारता आपल्याजवळील जाणकार सर्पमित्रांना बोलवावे. ते येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून सापावर लक्ष ठेवावे. अशा वेळी लहान मुले तसेच पाळीव प्राणी सापा पासून दूर राहतील याची दक्षता घ्यावी.
१३) सापाच्या जवळ जाऊन त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळेस अनर्थ घडू शकतो.
 १४) नाग, मण्यार, घोणस, आणि फुरसे हे मानवी वस्तीत आढळणारे प्रमुख विषारी साप आहेत. त्यांचा दंश प्राणघातक असल्यामुळे यांच्या पासून सावध राहावे.
१५) प्रत्येकाने विषारी बिनविषारी साप कसे ओळखावेत याची एकदातरी माहिती घेतलेली घ्यावी.
१६) पावसाळा सुरू झाला की मानवी वस्ती मध्ये तसेच इतरत्र साप आढळण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. या काळात सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते. कारण उन्हाळ्यात जमिनीखाली बिळात सुरक्षित असणारे साप पावसाचे पाणी बिळांत शिरताच असुरक्षित होऊन बाहेर पडतात. व इतरत्र निवाऱ्याच्या शोधात फिरत असतात. त्याच बरोबर या काळात त्यांचा मिलन/प्रजनन काळ असतो. त्यामुळे पावसाळ्यात सुरुवातीपासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत सर्वांनी सापापासून दक्ष राहणे गरजे आहे.
१७) काही साप पाण्याजवळ राहतात त्यामुळे अंघोळ करायच्या न्हाणी जवळ पाणी साठू देऊ नये. आंघोळीला जाण्यापूर्वी तेथे चांगला उजेड करून पहावे.


माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर


शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment