सी. एल. न्युजच्या वाचकांनी सापांच्या मालिकेविषयी व्यक्त केलेल्या निवडक प्रतिक्रिया ११ ते १५ - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2020

सी. एल. न्युजच्या वाचकांनी सापांच्या मालिकेविषयी व्यक्त केलेल्या निवडक प्रतिक्रिया ११ ते १५

 सी. एल. न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका वाचकांच्या प्रतिक्रिया

मण्यार

सी. एल. न्यूज चॅनेल च्या सर्व वाचकांना मनःपूर्वक नमस्कार, 

       मागील दोन महिन्यात आपणासमोर सापांची माहिती देणारी ३८ भागांची मालिका सुरू होती ती समाप्त होत आहे. काही वेळा महापूर, नेटवर्क व तंत्रिक समस्येमुळे मालिका खंडित होऊनही आपण भरभरून प्रतिसाद दिलात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीसह सर्व ठिकाणचे नागपंचमी उत्सव रद्द करण्यात आले होते. त्यामुळे चंदगड लाईव्ह न्युज चॅनेलचे संपादक संपत पाटील तसेच पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी नागपंचमी पासून सी एल न्यूज च्या वाचकांसाठी सापांची माहिती देणारी मालिका सुरू करावी अशी मला विनंती केली. हे शिवधनुष्य मला पेलवेल की नाही? या विचारातच होकार दिला आणि ढोलगरवाडीचे सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील, शेतकरी शिक्षण मंडळ व सर्पशाळेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, निवृत्त वन अधिकारी भरत पाटील आदींचे मार्गदर्शन व सहकार्यातून मालिकेला सुरुवात केली. याला केवळ चंदगड नव्हे तर कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रास   इतर राज्ये व परदेशातील सी एल च्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल चंदगड लाईव्ह न्युज च्या वतीने सर्वांचे शतशः धन्यवाद!  पुढील काळातही 'आपल्या हक्काचे व्यासपीठ' असलेल्या सी एल न्यूजला सर्वांनी ताकद द्यावी ही नम्र विनंती!!


 मालिका संपादक :- श्रीकांत व्ही. पाटील, कालकुंद्री ता. चंदगड. (उपाध्यक्ष- चंदगड तालुका पत्रकार संघ)


   सी. एल. न्यूजच्या अवाहनावरून मालिकेविषयी अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया प्रसारित करत आहोत.

--------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया क्र. ११

प्रा. सदाशिव पाटील

     सालाबाद प्रमाणे होणारी ढोलगरवाडी सर्प शाळेची नागपंचमी यावर्षी कोरोना संसर्गामुळे आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी उत्सव बंद झाला असला तरी चंदगड तालुक्याचे मुखपत्र चंदगड लाईव्ह न्युज च्या माध्यमातून श्रीकांत पाटील सर यांनी विषारी बिनविषारी साप, गैरसमजुती, अंधश्रद्धा, सर्पदंश, प्रथमोपचार, सर्पदंश होऊ नये यासाठी घ्यायची दक्षता अशी सर्व माहिती ३८ भागांच्या मालिकेतून सविस्तर दिली. सेंट्रल 'झू' ची मान्यता असलेली १९६६ पासून आद्य सर्पमित्र बाबुराव टक्केकर यांनी सुरू केलेली आमची सर्प शाळा या माध्यमातून परदेशातही जाऊन पोहोचली. मालिका सुरू असताना मराठी सह काही कन्नड, इंग्रजी आणि हिंदी दैनिकांनी ही मालिका भाषांतर करून आपल्या  वृत्तपत्रासाठी देण्याची विनंती करणारे फोन आमच्याकडे आले.  यावरून या मालिकेची यशस्विता लक्षात येते. श्रीकांत पाटील व पत्रकार संघाने चंदगड लाईव्ह न्युज च्या माध्यमातून यापुढेही अशा मालिका लोकांपर्यंत पोहोचवाव्यात ही सदिच्छा. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

 सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील (सर्पालय प्रमुख ढोलगरवाडी, ता. चंदगड)
-----------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. १२
राजूभाई के पाटील
        महाराष्ट्रातील लोकराजा शाहूंचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याबद्दल आम्हाला विशेष प्रेम आणि अभिमान आहे. तेथील चंदगड लाईव्ह न्यूज ने सापांची माहिती देणाऱ्या मालिकेतून ज्या सपांची आम्हाला काहीच माहिती नव्हती त्याची फोटोसहीत जबरदस्त माहिती दिली. साप हे आपले मित्रच आहेत; पर्यावरण संतुलनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत हे समजले. काल्पनिक कथा, सिनेमातून नागसाप बदनाम झाल्याचे समजले. सापांना न्याय मिळवून देणारे मालिकेचे प्रमुख श्रीकांत पाटील व चंदगड लाईव्ह न्युजचे अभिनंदन! अशा नवनवीन मालिका व बातम्या परराज्यातील  आम्हा मराठी बांधवांपर्यंत पोचवाव्यात ही सदिच्छा !!
            राजूभाई के पाटील, मोरबी- गुजरात (अध्यक्ष- अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळ, सदस्य द्वारका महाराष्ट्र मंडळ)
--------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. १३
सौ. मंगल संजय नौकुडकर
         चंदगड तालुक्याचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या चंदगड लाईव्ह न्युज चॅनेलने नागपंचमी पासून सुरू केलेली सापांची माहिती देणारी मालिका आदर्शवत होती. माहिती वाचून सापांबद्दलची मनातील भीती नाहीशी झाली. साप हा शत्रू नसून शेतकऱ्यांसह सर्वांचा मित्र आहे. साप सुद्धा पर्यावरण संतुलन राखण्यात महत्त्वाचे आहेत ही भावना मनात दृढ झाली. मालिका प्रमुख श्रीकांत पाटील आणि चंदगड तालुका पत्रकार संघ.
              सौ. मंगल संजय नौकुडकर (माणगाव, ता. चंदगड)
--------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. १४
 विठोबा रा. मुंगूरकर
          चंदगड लाईव्ह न्यूज ने नागपंचमी पासून विषारी व बिनविषारी सापांविषयी मालिका सुरू केली होती. या मालिकेमुळे सर्व लोकांना सापांविषयी सखोल माहिती मिळाली आहे. या माहितीमुळे विषारी कोणते व बिनविषारी साप कोणते हे ओळखणे सोपे झाले आहे. त्यामुळे सापांचे जतन आणि शेतीचे व पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे.
चंदगड लाईव्ह न्यूज ला धन्यवाद!!
        विठोबा रा. मुंगूरकर, (कालकुंद्री, ता. चंदगड)
---------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया क्र. १५
के. जे. पाटील
          चंदगड लाईव्ह न्यूजच्या नागपंचमी पासून प्रसारीत सर्प  मालिकेतून सलग ३६ सापांविषयी माहिती वाचायला मिळाली. त्यातील विषारी, बिनविषारी कोणते, विषाचे प्रकार, सर्पदंशा नंतरची लक्षणे, उपचार, दक्षता, गैरसमज हे सविस्तर समजले. सापांच्या उठावदार चित्रातून त्यांची माहिती वाचण्याची उत्सुकता लागून रहायची. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. निसर्गसाखळीचा तो एक अत्यावश्यक घटक आहे. अशा दृष्टीकोनातून सापाकडे पाहण्याची मनोवृत्ती या मालिकेने निर्माण केली आहे.
        या सलग मालिकेसाठी  श्रीकांत पाटील सरांनी अथक प्रयत्न करुन हा एक आगळावेगळा स्तुत्य उपक्रम राबवला. त्यांचे व सी.एल्.न्यूजचे हार्दिक अभिनंदन!
               के. जे. पाटील (साहित्यिक, कालकुंद्री, ता. चंदगड)
-----------------------------------------------------------------------------------No comments:

Post a Comment