सीपीआरच्या ट्रामा सेंटर मध्ये स्फोट, नागरदळेच्या हॉटेल मॅनेजरचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2020

सीपीआरच्या ट्रामा सेंटर मध्ये स्फोट, नागरदळेच्या हॉटेल मॅनेजरचा मृत्यू

कागणी : संदीप तारीहाळकर, सी. एल. न्यूज प्रतिनिधी

            कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये (छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय) सोमवारी दि. २७ रोजी पहाटे तीन वाजता शॉर्टसर्किटने गळती आणि यानंतर झालेल्या व्हेंटिलेटरच्या भीषण स्फोटात नागरदळे (ता. चंदगड) येथील विजयकुमार रामचंद्र कांबळे (वय 45) या रुग्णासह अन्य दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट दिली. तर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पहाटे साडे चारला सायकलने घटनास्थळ गाठले सदर घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
        विजयकुमार हे अनेक दिवसांपासून संकेश्वर येथे हायवेला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. या दरम्यानच ते आजारी होते. त्यांना सुरुवातीला टायफाईड त्यानंतर निमोनिया आणि त्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने आरोग्य सेविका   असलेल्या चुलत  बहीण सुजाता यांच्या सूचनेनुसार दि. 20 रोजी विजयकुमार हे संकेश्वर हून थेट चंदगड येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल झाले. यानंतर त्यांना दि. 23 रोजी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते. या दरम्यान प्रकृती सुधारत असतानाच दि. 28 रोजी पहाटे तीन वाजता सीपीआरमधील ट्रामा सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे सीपीआर प्रशासनाने जाहीर केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई असा परिवार आहे. चंदगड येथील शासकीय होस्टेलचे रेक्टर संजय कांबळे यांचे ते भाऊ तर नागरदळे येथील आरोग्य सेविका सुजाता कांबळे यांचे ते चुलत बंधू होते. या घटनेमुळे नागरदळे गावावर शोककळा पसरली आहे. 
         या घटनेत ट्रामा सेंटरमध्ये असलेले पाच सुरक्षारक्षकही जखमी झाले आहेत. तर बाबासाहेब श्रीपती भोजे (सिद्धार्थनगर, कोल्हापूर, वय 52),  मुक्ताबाई विश्वास पाटील (वय ५०, बानगे, ता. कागल) यांचाही मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment