राजगोळी खुर्द प्रा. आ. केंद्र तात्काळ सुरू न केल्यास आंदोलन, भाजपचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2020

राजगोळी खुर्द प्रा. आ. केंद्र तात्काळ सुरू न केल्यास आंदोलन, भाजपचा इशारा

राजगोळी प्रा.आ. केंद्र सुरू करावे या मागणीसाठी निदर्शने करताना भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ.
कालकुंद्री / प्रतिनिधी
         लाखो रुपये खर्च करून राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे उभारण्यात आलेली सुसज्ज नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत गेल्या वर्षभरापासून धूळ खात पडून आहे. येथे तात्काळ वैद्यकीय अधिकारी व इतर स्टाफ पाठवून आरोग्य सेवा सुरु करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष डॉ. संदेश जाधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे.
        राजगोळी खुर्द येथे कालकुंद्री, कुदनुर, तळगुळी, राजगोळी बुद्रुक, दिंडलकोप, कामेवाडी आदी गावांतील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी शासनामार्फत सुसज्ज इमारत बांधली आहे. इमारत पूर्ण होऊन वर्ष होऊन गेले तरी येथे वैद्यकीय अधिकारी किंवा इतर कुठलीही आरोग्य सुविधा नाही. आरोग्य केंद्र इमारत निवडणूक आचारसंहिता आणि त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उद्घाटन केव्हाही करा. सध्या कोरोना महामारी च्या काळात सर्व हॉस्पिटल आणि आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. कोविड ग्रस्त रुग्णाला ४०-५० किमी चंदगडला न्यायचे असेल तर दोन तीन हजार रुपये खर्च येतो. नातेवाईकांना मनस्ताप होतो. हे टाळण्यासाठी कोरोना संपेपर्यंत येथे कोविड सेंटर सुरू करुन सर्व सुविधायुक्त आरोग्य सेवा तात्काळ देणे गरजेचे असताना संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. असा आरोप करत आरोग्य केंद्र इमारत परिसरात घोषणाबाजी करण्यात आली. याबाबतचे निवेदनही संबंधितांना पाठवल्याचे समजते. 
        यावेळी डॉ. संदेश जाधव, मल्लिकार्जुन मुगेरी, भावकु गुरव आदी भाजपा पदाधिकाऱ्यांसह सरपंच मावळेश्वर कुंभार, लक्ष्मण कडोलकर, बाबू मोदगेकर, महादेव धुळे, नारायण लोहार, उमेश इनामदार, नारायण कडोलकर, परशुराम सुतार, नारायण लोहार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment