किल्ले पारगडवरील पर्यटकांची गर्दी रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान, स्थानिकांचे आरोग्य धोक्यात - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2020

किल्ले पारगडवरील पर्यटकांची गर्दी रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान, स्थानिकांचे आरोग्य धोक्यातकिल्ले पारगड
चंदगड : सी एल वृत्तसेवा 
         कोरोना महामारीच्या काळात राज्य  व देशातील सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद असताना चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड वर मात्र पर्यटकांचा ओघ सुरूच आहे. बंदी असलेल्या भागातूनही बरेच पर्यटक गेल्या चार महिन्यात राजरोसपणे किल्ल्यावर गर्दी करत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने पर्यटकांना रोखणारी यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी होत आहे.
       जून महिन्यात कोरोना दक्षता कमिटी किल्ले पारगड यांनी तहसीलदार चंदगड व उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांना या ठिकाणी पर्यटकांना येण्यास बंदी घालावी अशी विनंती केली होती. त्याचबरोबर चंदगड बेळगाव आदी भागातून येणारे पर्यटक हे पाटणे फाटा तसेच हेरे,  मोटणवाडी दरम्यानच्या इसापूर पारगड फाटा मार्गे येत असतात. या ठिकाणांसह बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील चंदगड फाटा येथे पर्यटकांसाठी पारगड किल्ला बंद करण्यात आला असल्याचे फलक लावावे अशी विनंती करण्यात आली होती. तथापि त्याची पूर्तता न झाल्यामुळे पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. काही वेळेला तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे किल्ल्याचे पावित्र्य आणि शांतता भंग पावते.
          सुरुवातीचे काही दिवस कोरोना दक्षता कमिटीने किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांना रोखण्याचा प्रयत्न केला तथापि वादावादीचे प्रसंग उद्भवले. हे काम कमिटीच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे पर्यटकांना रान मोकळे झाले आहे. 
      मुसळधार पावसातही पर्यटकांची संख्या कमी नाही. पावसामुळे आणलेले खाद्यपदार्थ मंदिरात बसून खाल्ल्यानंतर कचरा तिथेच टाकून जातात. त्यामुळे मंदिरांच्या  स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  तसेच आलेल्या  पर्यटकांमार्फत पारगड व परिसरात कोरोना किंवा अन्य आजारांचा शिरकाव झाल्यास २५-३० किमी परिसरात कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसलेल्या येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या सर्व बाबींचा विचार करून तहसीलदार, पोलीस प्रशासन तसेच वन विभागांने तात्काळ उपाय योजना करावी. अशी मागणी किल्ले पारगड ग्रामस्थांच्या वतीने  ग्रामस्थ मंडळ मुंबई चे अध्यक्ष कान्होबा माळवे तसेच कोरोना दक्षता कमिटीचे अध्यक्ष रघुवीर शेलार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment