सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३२ : समुद्री साप  (too sea snake)
                                             समुद्री साप 
           समुद्री साप हे ईलापीडी कुळातील असून याचे शास्त्रीय नाव हायड्रोफीना/ हायड्रोफिस (इंग्लिश नाव- टु सी स्नेक) असे आहे. समुद्री साप हे जमिनीवर फार काळ जगू शकत नाही तर काही प्रजातींचे साप अंडी घालण्यासाठी जमिनीवर येतात. ते उभयचर सारखे आयुष्य जगू शकतात. समुद्री सापाच्या 50 ते 60 प्रजाती असून यातील सुमारे 20 प्रजाती भारतीय उपखंडातील समुद्रात आढळतात. समुद्रातील विशेषतः उथळ पाण्यात दगडांच्या कपारीत तसेच पाणवनस्पतींच्या मुळाजवळ वास्तव्य करतात. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी यांना मिठ ग्रंथी असतात. यांची यांची त्वचा ही जाड असते. समुद्री सापांच्या सर्वच प्रजाती कमी-अधिक प्रमाणात विषारी असतात काही सापांचे विष नागापेक्षा कित्येक पट धोकादायक असते. पण
याच्या चाव्यामुळे माणसे मेल्याच्या घटना फार दुर्मिळ आहेत. कारण तो जमिनीवरील सापांच्या तुलनेत फारच लाजाळू/ भित्रा असल्याने माणसाची चाहूल लागताच दूर पळून जातो. पकडण्याचा प्रयत्न केला तरी तो पळण्यासाठीच धडपडत असतो. शरीराच्या मानाने याचे तोंडही बरेच लहान असते. याची शेपटी जमिनीवरील सपांसारखी निमुळती नसता चपटी असते. याचा त्याला पोहण्यासाठी उपयोग होतो.
          जगाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन समुद्रात यांची संख्या अधिक आहे. जमिनीवरील साप नसलेला देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंडच्या किनार्यालगत समुद्री साप मात्र आहेत. कमकुवत व दुर्बल मासे हे समुद्री सापांचे मुख्य अन्न असल्यामुळे माशांची पुढची पिढी बलशाली करण्यास ते अप्रत्यक्षरीत्या सहाय्यभूत ठरतात. माशांसारखे कल्ले नसल्यामुळे सापांना श्वासोच्छवास व उबेसाठी समुद्र पृष्ठभागावर यावे लागते. यावेळी ते समुद्री गरुड पक्षांची शिकार बनतात. पृष्ठभागावर येऊन एकदा श्वास घेतल्यानंतर किमान वीस ते चाळीस मिनिटे ते पाण्याखाली राहू शकतात. 
समुद्री सापांचे हायड्रोफिस व लॅटिकौडा असे दोन प्रकार पडतात. यातील लॅटीकौडा अंडी घालण्यासाठी किनार्यालगत जमिनीवर येतात. (या प्रजातीतील पट्टेरी समुद्री मण्यार सुद्धा आहेत) हे साप उभयचर सारखे राहू शकतात.
        बहुतेक समुद्री सापांच्या अंगावर गडद आणि फिकट रंगाचे पट्टे  असतात यामुळे पोहताना साप पुढे जात आहे की मागे, असा संभ्रम निर्माण होतो. यात समुद्र पृष्ठभागावर वावरणाऱ्या मोठ्या पक्षांचीही फसगत होते. बहुतांशी समुद्री साप पिलांना जन्म देतात पण पिल्लांची काळजी घेत नाहीत.
           बऱ्याच वेळा समुद्री साप मासेमारीच्या जाळ्यात अडकतात व गुदमरुन मरतात. त्यांना मच्छीमार किनाऱ्यावर फेकून देतात. यातील अर्धमेले साप पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. बहुतेक सापांना जमिनीवर सरपटता येत नाही ते भरतीची वाट पाहत तसेच पडून राहतात.  अन्नसाखळीत समुद्री सापांची भूमिका अनन्य साधारण आहे. त्यामुळे भारतीय उपखंडात आढळणाऱ्या समुद्री सापांना वन्यजीव संरक्षण कायदा अनुसूची ४ नुसार संरक्षित घोषित करण्यात आले आहे.
माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.
आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  
सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर


No comments:
Post a Comment