इसापूर शाळा : वर्ग ७ शिक्षक १ विद्यार्थ्यांचे नुकसान, ग्रामस्थांचा टाळे ठोकोचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2020

इसापूर शाळा : वर्ग ७ शिक्षक १ विद्यार्थ्यांचे नुकसान, ग्रामस्थांचा टाळे ठोकोचा इशारा

चंदगड : सी एल वृत्तसेवा

       इसापूर (ता. चंदगड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सात वर्ग असून या सात वर्गांना सध्या एकमेव शिक्षक असल्यामुळे विद्यार्थी व शाळेचे प्रचंड नुकसान होत आहे. शाळेत तात्काळ शिक्षक न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून याबाबतचे निवेदन सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी गटशिक्षणाधिकारी चंदगड यांना दिले आहे.

    चंदगड तालुक्याच्या पश्चिमेकडील सिंधुदुर्ग, गोवा हद्दीलगत अति दुर्गम, डोंगराळ भागात कोल्हापूर जि प ची विद्यामंदिर इसापूर शाळा आहे. नजीकच्या पारगड, नामखोल, मिरवेल या चौथीपर्यंतच्या शाळांमध्ये  इसापूर ही एकमेव सातवीपर्यंतची शाळा आहे.  या सात शिक्षकी शाळेत सध्या चार शिक्षक पदे मंजूर आहेत. तथापि गेल्या काही महिन्यापासून दोनच शिक्षक होते. यातील एका शिक्षकाची बदली झाल्यामुळे सध्या एकमेव शिक्षक शिल्लक आहेत. सातवीपर्यंतचे वर्ग, कार्यालयीन काम, त्यात भाराभर अशैक्षणिक कामे अशा चक्रव्यूहात एकमेव शिक्षक काम करत आहेत. यात प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शाळेला शिक्षक न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. तर याबाबतचे निवेदन सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या सहीने गटशिक्षणाधिकारी चंदगड यांना दिले आहे. पुढील कार्यवाहीकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




No comments:

Post a Comment