मायक्रो फायनान्सच्या अन्यायी वसुली विरोधात महिलांचा चंदगड तहसिल कार्यालयावर मोर्चा, बेकायदेशीर वसुली विरोधात कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2020

मायक्रो फायनान्सच्या अन्यायी वसुली विरोधात महिलांचा चंदगड तहसिल कार्यालयावर मोर्चा, बेकायदेशीर वसुली विरोधात कारवाई

मायक्रो फायनान्सच्या अन्यायी वसुली विरोधात महिलांनी चंदगड तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आपले म्हणने मांडताना महिलावर्ग.

चंदगड / प्रतिनिधी 

        चंदगड तालुक्यातील अनेक गावांतील महिलांनी मायक्रो फायनान्स कडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. या विरोधात आज तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी चंदगड तहसिलदार मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसिलदार विनोद रणवरे याांना देण्यात आले. यावेळी बेकायदेशीर वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन तहसिलदारांनी मोर्चेकरांना दिले. 

कंपनी विरोधात आक्रमक झालेल्या महिला.

       तालुक्यातील बचत गटाच्या महिला माडखोलकर महाविद्यालयासमोर एकत्र जमल्या. मोर्च्याला दुपारी एक वाजता सुरवात झाली. बेकायदेशीर वसुल करणाऱ्या वसुली अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करा. महिला बचत गटाचे कर्ज माफ झालेच पाहिजे, आम्ही मागतो हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत महिलांचा मोर्चा संभाजी चौक, पंचायत समिती मार्गे तहसिल कार्यालयासमोर आला. या ठिकाणी घोषणा देत महिलांनी ठिय्याच मारला. जोपर्यंत या वसुली अधिकाऱ्यावर शासन कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली. जवळपास दोन तास महिलांनी ठिय्या मारला. त्यामुळे चंदगड बस आगारातून बाहेर जाणाऱ्या व बाहेरुन येणाऱ्या  बसेस थांबून होत्या. 

         याठिकाणी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील, महिला युवा मोर्चाच्या जिल्हाउपाध्यक्ष रत्नप्रभा देसाई यांनी सद्या कोरोनाच्या काळात सर्व उत्पनाचे स्तोत्र बंद असल्याने सर्वसामान्य माणसाला खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. असे असताना मायक्रो फायनान्सकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे, तो थांबला पाहिजे असे सांगितले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष मल्लीकार्जुन मुगेरी, सरपंच स्वप्नाली गवस, माधुरी सावंत-भोसले यांनी मनोगत व्यक्त केली. महिलांनी मायक्रो फायनान्स वसुली अधिकारी कसे त्रास देतात याबद्दलचे अनुभव कथन केले. तहसिलदार विनोद रणवरे यांनी यावेळी बेकायदेशीर वसुली करण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे लेखी निवेदन दिल्याने महिलांनी ठिय्या अंदोलन मागे घेतले. यावेळी नगरसेविका अनुसया दाणी, संदीप नांदवडेकर, आनंद कांबळे, जयंत देसाई, शशिकांत पाटील, अशोक दाणी, भुजंग नाईक, सुनिता गावडे, वंदना नाईक, गीता नाईक आदीसह तालुक्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
No comments:

Post a Comment