पी. एन. पाटील यांच्या निधनामुळे सत्यशोधक चळवळीची मोठी हानी - प्रशांत कुट्रे - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2020

पी. एन. पाटील यांच्या निधनामुळे सत्यशोधक चळवळीची मोठी हानी - प्रशांत कुट्रे

कै. पी. एन. पाटील यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहताना कुटुंबीयांसमवेत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

         मराठा क्रांती मोर्चा समन्वयक पी एन पाटील यांच्या अकाली निधनामुळे चंदगड तालुक्यातील सत्यशोधक, पुरोगामी, मराठा क्रांती मोर्चा चळवळ व मराठा आरक्षण आंदोलनाची अपरिमित हानी झाली आहे. असे उद्गार मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कुट्रे यांनी काढले. ते शिवनगेचे रहिवाशी व ताम्रपर्णी विद्यालयाचे अध्यापक प्रमोद नागोजी तथा पी एन पाटील (वय ४५) यांच्या निधनानिमित्त शिवणगे येथे शोकसभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कै. पी. एन. पाटील

          गेल्या पंधरा वर्षापासून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी तसेच पुरोगामी व सत्यशोधक चळवळ वाढवण्यासाठी धडपडणारे विज्ञानवादी शिक्षक होते. ते कर्करोगाने आजारी होते. मृत्यूपूर्वी त्यांनी आपला अंतिम विधी शिवधर्म पद्धतीने व्हावा अशी इच्छा कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. त्याची पूर्तता कुटुंबियांनी केली. यावेळी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष शहाजी देसाई  (कडगाव, भुदरगड) यांनी जिजाऊ वंदना गायीली, शिवधर्म पद्धतीने जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या विधींची माहिती विशद केली. माणसाच्या मृत्यूनंतर नको त्या धार्मिक विधींचे अवडंबर न माजवता शिवणगे येथील पाटील कुटुंबियांचा आदर्श समाजाने घ्यावा असे आवाहन केले. पी एन पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन  वैज्ञानिक विचारांचे अनेक बुरुज निर्माण होतील व सत्यशोधक चळवळीचा किल्ला शाबूत राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आपल्या वडिलांच्या निधनानंतरही प्रमोद यांनी त्यांचे अंतिम संस्कार शिवधर्म पद्धतीने केले होते हे विशेष. 

            यावेळी शेतकरी संघटनेचे नेते प्रा. दीपक पाटील (ढोलगरवाडी), शिक्षक परिषद जिल्हा कार्याध्यक्ष व पत्रकार श्रीकांत पाटील (कालकुंद्री), गुडेवाडी विद्यालयाचे अध्यापक एल पी पाटील (कडलगे खुर्द) आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी राजाराम देसाई (आजरा), किरण देसाई (शिरसंगी) आदींसह ग्रामस्थ व पाटील कुटुंबीयांची उपस्थिती होती. पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, आई असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment