कुदनुर येथील सिद्धेश्वर तलावातील पाण्याला दुर्गंधी, ग्रामपंचायतीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2020

कुदनुर येथील सिद्धेश्वर तलावातील पाण्याला दुर्गंधी, ग्रामपंचायतीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

दुर्गंधीयुक्त, हिरवे झालेले कुदनुर येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर नजीकच्या तलावाचे पाणी.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

      कुदनुर (ता. चंदगड) गावाच्या सौंदर्यात भर घालणारा ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर नजीकच्या सिद्धेश्वर तलावाची गेल्या काही वर्षात दुरावस्था झाली आहे. सद्यस्थितीत तलावातील पाणी पूर्णपणे खराब झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ग्रामपंचायतीने यावर स्वच्छतेच्या उपायोजनांसह तलावातील पाणी बदलावे. अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांनी केली आहे.

 १९७२ च्या दुष्काळात ग्रामपंचायत व शासकीय रोजगार हमी योजनेअंतर्गत या तलावाची खुदाई करण्यात आली होती. तेव्हापासून सिद्धेश्वर मंदिर व तलाव परिसर गावाच्या सौंदर्य व  वैशिष्ट्यात भर घालत होता. ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी हे विरंगुळ्याचे ठिकाण बनले होते. गेल्या दहा बारा वर्षापर्यंत तलावातील पाणी सुस्थितीत होते. तथापि अलीकडच्या काळात सांडपाणी किंवा अन्य कारणास्तव दिवसेंदिवस पाणी खराब होत चालले आहे. वाढत्या दुर्गंधीमुळे सद्यस्थितीत इकडे ग्रामस्थांसह भाविकही जाणे टाळत असल्याचे चित्र आहे.

 कुदनुर ग्रामपं. ने तलावाचे पाणी खराब होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय योजना कराव्यात. तसेच तलाव पूर्ण रिकामी करून किटवाड धरणातील पाण्याने पुन्हा भरून घ्यावा व कुदनुर गावाचे हे वैशिष्ट्य, मंदिर परिसराचे पावित्र्य अबाधित ठेवून तलावाचे सुशोभीकरण करावे. अशी मागणी ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी केली आहे.


No comments:

Post a Comment