पीक नुकसानीचे पंचनामे ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रशासनाला सूचना, कर्यात भागातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2020

पीक नुकसानीचे पंचनामे ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रशासनाला सूचना, कर्यात भागातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

नुकसानग्रस्त भागातील भात शेताची पाहणी करताना सतेज उर्फ बंटी पाटील,आमदार राजेश पाटील,विद्याधर गुरबे, कलाप्पा भोगण व इतर. (छायाचित्र - दर्पण फोटो कोवाड) 

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

         नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून त्वरित भरपाई दिली जाईल. याला तलाठी व ग्रामसेवक जबाबदार असतील असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना जास्तीची मदत देण्यासाठी प्रयत्न करू अशीही ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.परतीच्या पावसात कर्यात भागात झालेल्या नुकसानीची आज (रविवारी) पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. 

कोवाड येथील पुलाची पाहणी करताना सतेज उर्फ बंटी पाटील,आमदार राजेश पाटील ,विद्याधर गुरबे आदी.
(
छायाचित्र - दर्पण फोटो कोवाड) 

         यावेळी आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, कृषी अधिकारी किरण पाटील, जि.प सदस्य कल्लापा भोगण, जि.प सदस्य सचिन बल्लाळ, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे, काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजी देसाई (शिरोलीकर), तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

कर्यात भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील,आमदार राजेश पाटील,विद्याधर गुरबे,प्रांताधिकारी विजय पांगारकर.

         यावेळी सतेज पाटील म्हणाले, कुठलाही पंचनामा हा शिल्लक राहता कामा नये, लोकांना पंचनामा करण्यासाठी गावामध्ये सूचना दिल्या जातील. तलाठी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून सर्व पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. कुणाचा पंचनामा राहिला तरी त्यांनी नंतर गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे लेखी दिल्यास त्यांचाही समावेश केले जातील.

            राज्य शासन या विषयी तत्परतेने गांभीर्यपूर्वक नुकसान भरपाई देण्यासाठी पावलं उचलतंय, ३० ऑक्टोबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पंचनामे पूर्ण होतील, चंदगड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई देण्याचा प्रयत्न असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

          चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यावर होत असलेल्या वन्य प्राण्यांचे हल्ले या प्रश्नावर बोलताना आमदार राजेश पाटील यांनी सांगितले की सद्यस्थितीत गवा,अस्वल,,कोल्हा इ प्राण्याकडून वारंवार हल्ले हे होत असून याबाबत वन विभागाशी येत्या दोन दिवसात चर्च्या करून यावर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे.तसेच वन क्षेत्रा दरम्यान नागरी वस्तीमध्ये वन्य प्राण्यांचा शिरकाव रोखण्यासाठी मोठं मोठया चरी मारून वन्य प्राण्यांचा शिरकाव रोखन्याबाबत पुरेपूर प्रयत्न करणार आहे.त्याबरोबरच तालुक्यातील वन्य प्राण्यांचा भाग अभयारण्य म्हणून घोषित करण्यातबाबत प्रश्न उपस्थित करणार असून जेणेकरून वन्य व शेतकरी यांचा प्रत्यक्ष संपर्क टाळून वन्य प्राण्यापासून होणारे शेतीचे नुकसान टाळता येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील दुंडगे, कुदनूर, कालकुंद्रिमार्गे कोवाड भागातील भात नुकसानग्रस्त शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी  दुंडगे पुलाची पाहणी करून येथील समस्या जाणून घेतली. त्याचबरोबर कोवाड येथील ताम्रपर्णी नदी परिसरातील भात शेतीसह जुन्या पुलाचे बर्गे खुले करण्याबाबत समस्या जाणून घेतल्या.कर्यात भागात भेडसावत असणाऱ्या अनेक प्रश्नांवर यावेळी चर्च्या केली असून तालुक्यातील सर्व प्रश्न सोडविण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

                                                        बातमीदार - संजय पाटील, कोवाड

No comments:

Post a Comment