बेरड रामोशी समाज; विविध मागण्यांचे तहसीलदार, आमदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2020

बेरड रामोशी समाज; विविध मागण्यांचे तहसीलदार, आमदारांना निवेदन

जय मल्हार क्रांती संघटना, बेरड रामोशी समाजाच्या मागण्यांचे निवेदन आमदार राजेश पाटील यांना देताना पदाधिकारी व कार्यकर्ते.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       महाराष्ट्रातील बेरड रामोशी समाजाला भारतीय राज्यघटनेचे कलम ३४१ व  ३४२ नुसार दिलेल्या घटनात्मक हक्क व अधिकाराची अंमलबजावणी व्हावी. यासाठी जय मल्हार क्रांती सेना व समाजाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार चंदगड यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

       निवेदनात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने  स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, समाजाचा विकास आराखडा तयार करावा, बेरड रामोशी समाजाचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करावा, उमाजी राजे व बहिर्जी नाईक यांच्या कार्याची माहिती पाठ्यपुस्तकात द्यावी, उमाजी राजे यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी द्यावा, नरवीर बहिर्जी नाईक यांचे नाव गुहागर- विजापूर राज्य महामार्गाला देण्यात यावे, रामोशी वतनी जमीनी बिनशर्त परत मिळाव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांचा ऑक्टोबर अखेर विचार न झाल्यास बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात दिला आहे. जय मल्हार क्रांती सेनेचे संस्थापक दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य युवक कार्यकारीणी सदस्य अमोल नाईक, चंदगड तालुका अध्यक्ष सिताराम नाईक, आप्पाजी चिंचणगी, परसू नरी आदींनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तहसील कार्याला कार्यालयाला निवेदन सादर केले. हे निवेदन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनाही देण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment