आदर्श पॅरामेडिकल कंपनीने शिवरायांचे छायाचित्र लावून बनवलेला वादग्रस्त मास्क |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
संभाजी ब्रिगेड कोल्हापुरच्या दणक्यामुळे आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट कंपनीने कर्मचार्यांसाठी बनवलेल्या मास्क वरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र हटवले. कंपनीचे संचालक किशोर ठोकळे यांनी झालेल्या चुकीबद्दल संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्याकडे माफीनामा सादर केला.
याबद्दलची हकीकत अशी, आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट पुणे ही संस्था पुणे व कोल्हापूर येथे कार्यरत असून कोल्हापूर शहर कार्यालयाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र फेस मास्कवर छापले. हे मास्क स्टाफच्या कर्मचारी व कार्यालयात आलेल्या इतर लोकांना वाटण्याचे काम चालू होते हे समजताच काही शिवप्रेमींनी याबद्दलची तक्रार संभाजी ब्रिगेड कडे केली. त्यानंतर संभाजी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्यासह ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना ब्रिगेडच्या स्टाईलने चांगलेच फैलावर घेत जाब विचारला. झालेल्या चुकीबद्दल कंपनीने लोटांगण घालत ब्रिगेड कडे लेखी माफीनामा सादर केला. भविष्यात अशी चुक पुन्हा होणार नाही. याची काळजी घेतली जाईल अशी हमी देत शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केली. यावेळी रुपेश पाटील यांच्यासह विकी जाधव, अभिजित भोसले, उमेश जाधव, सुशांत नौकुडकर, नीलेश सुतार, अभिजीत कांजर, किरण पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवरायांसह बहुजन महामानवांच्या प्रतिमांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आवाज उठवणाऱ्या संभाजी ब्रिगेड बद्दल दिवसेंदिवस आदर वाढत आहे. काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडने 'संभाजी बिडी' वरील छत्रपती संभाजी महाराजांचे छायाचित्र हटविण्याचे आंदोलन यशस्वी केले होते. संभाजी ब्रिगेडने अनेक सामाजिक प्रश्न हाती घेऊन त्यांची यशस्वी तड लावल्यामुळे संभाजी ब्रिगेड मराठा बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून हक्क मिळवून देणारा तारणहार अशी भावना दृढ होत आहे.
No comments:
Post a Comment