वृद्धांचा छळ, उपेक्षा, अवहेलना थांबवण्याची मागणी, चंदगड तालुक्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2020

वृद्धांचा छळ, उपेक्षा, अवहेलना थांबवण्याची मागणी, चंदगड तालुक्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वृध्द एकमेकांना शुभेच्छा देताना.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

      महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम शाखा चंदगड च्या वतीने तालुक्यात तिसावा ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न झाला. कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून मोबाईल, इंटरनेट ॲप द्वारे हा दिन साजरा करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य महासचिव सोमनाथ गवस यांनी दिली.

      १४ डिसेंबर १९९० रोजी युनोच्या सर्वसाधारण सभेत दरवर्षी १ आक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचा ठराव पास झाला होता. त्यानुसार १ ऑक्टोबर १९९१ रोजी पहिला जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. जेष्ठ नागरिकांची जगण्याची उमेद वाढवून आनंदी जीवन जगण्यास प्रोत्साहित करणे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या देशात ११ कोटी ज्येष्ठ नागरिक असून यातील ७० टक्के ग्रामीण भागात राहतात त्यातील ३० टक्के दारिद्र्यरेषेखाली असून तीस टक्के पेक्षा जास्त हलाखीचे जीवन जगत आहेत. केवळ १० टक्के ज्येष्ठांना पेन्शन मिळते. ४८ % ज्येष्ठ नागरिकांचा रक्ताच्या नात्या कडूनच छळ होत असल्याची माहिती सोमनाथ गवस यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांसाठी गावोगावी विरंगुळा केंद्र व्हावीत तेथे दूरदर्शन, वृत्तपत्र व इतर सुविधा कराव्यात, वयोवृद्धांना घरपोच औषधे मिळावीत. सर्व पुरुष महिलांना पेन्शन मिळावी, त्यांचा छळ, उपेक्षा, अवहेलना यांना आळा बसवावा आदी मागण्या शासनाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. ज्येष्ठ नागरिक दिना- निमित्त संघटनेने कोरोना महामारी च्या काळात वृद्धांनी सुरक्षित राहावे असे आवाहन केले आहे.


No comments:

Post a Comment