हेरे येथील दलित कुटुंबावर बहिष्कार घातल्याचा आरोप, चंदगड पोलिसात तक्रार - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2020

हेरे येथील दलित कुटुंबावर बहिष्कार घातल्याचा आरोप, चंदगड पोलिसात तक्रार

चंदगड / प्रतिनिधी

          चंदगड तालुक्यातील हेरे या गावातील हनुमंत महादेव कांबळे यांच्या संपूर्ण घराण्यावर त्यांच्याच समाजाने बहिष्कार घातला असून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने श्री. कांबळे यांनी चंदगड पोलिसात दिलेल्या तक्रारीत यांनी म्हटले आहे.

          पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चंदगड तालुक्यातील हेरे येथील राहणारे हनुमंत कांबळे हे  हेरे येथील रवळनाथ देवस्थानात  "कोलकार की" या नात्याने हक्क असल्याने १४ फेब्रुवारी २०२० रोजी सामाजिक अंतराचे भान ठेवून हक्कदार म्हणून देवस्थानाच्या वार्षिक कार्यक्रमात हजर  होते. आमचे  कुटुंब हजर राहिल्यामुळे आपल्या समाजाचा अपमान झाला आहे असे समजून आमच्या गल्लीत राहणारे आमच्या समाजाचे नारायण आप्पा कांबळे (पोलीस पाटील) भिमराव नारायण कांबळे, पिंट्या दत्तात्री कांबळे, दिगंबर संतु कांबळे, गणू कांबळे व इतर सुमारे ४० लोकांनी चिडून जाऊन गावातील एक राजकीय पुढाऱ्याच्या पुसलतीने सर्वजण माझ्या कुटुंबावरील लोकांवर वारंवार आम्हाला अपमानास्पद वागणूक देत आहेत. आमची सर्वच बाबतीत मुस्काट बंदी व्हावी, यासाठी सामाजिकदृष्ट्या बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे आमचे कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. या सर्व लोकांनी आम्ही कुठे कामाला जाऊ तेथे आमच्या विरोधात अपप्रचार करून आम्हाला  दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबात भितीचे वातावरण निर्माण झाले असून आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

          या प्रकरणी गावातील काही मध्यस्थ त्रयस्तानी समजुतदारपणाने जातीनिशी सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करूनही त्याचा काहीही उपयोग होत नाही झाला नाही. आमचे कुटुंब त्रासात असून कायमचा काटा काढला जावा, अशा प्रकारे धमक्या दिल्या जात आहेत. या सर्व बाबतीत गावचे सरपंच यांना वेळोवेळी आम्ही निदर्शनास आणून दिले आहे. कोणतेही कारण नसताना आमच्या कुटुंबाला या सर्व लोकांनी ११ ऑक्‍टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अर्वाच्च शिवीगाळ करून दमदाटी करुन काठ्या व कुर्‍हाडी घेऊन आमच्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही कसेबसे पाठीमागील दरवाजातून बाहेर पडून आमचे प्राण वाचवले आहेत. या सर्व गोष्टीमुळे आम्ही भयभीत झालो आहोत. तरीही आहे त्या परिस्थितीमध्ये कसेबसे आम्ही राहण्याचा प्रयत्न करत आहोत. या सर्व लोकांच्या अशा वागण्यामुळे आमचे सर्व कुटुंब चिंतेत आहे. आमचे मानसिक स्वास्थ मेटाकुटीला आले आहे. या लोकांमुळे आमच्या जीवाची शाश्वती राहिली नाही. आमच्यावर बहिष्कार टाकून आमचे सामाजिक जीवन देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तरी संबंधित लोकांच्यावर कायदेशीर  कारवाई करण्यात यावी अशा आशयाची तक्रार चंदगड पोलिस ठाण्यांमध्ये फिर्यादी हनुमंत कांबळे यांनी मंगळवारी दिली आहे.
No comments:

Post a Comment