'दौलत' साखर कारखाना ३० तास बंद ,अथर्व' व्यवस्थापानांची पोलिसात तक्रार - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2020

'दौलत' साखर कारखाना ३० तास बंद ,अथर्व' व्यवस्थापानांची पोलिसात तक्रार

दौलत-अथर्व कारखान्याच्या आवारात ऊसाने भरलेल्या वाहनांच्या रांगा. 

चंदगड - दौलत हलकर्णी / प्रतिनिधी

          चंदगड तालुक्यातील दौलत-अथर्व साखर कारखाना विविध घडामोडीनंतर गेल्या वर्षी सुरू झाला. चालू हंगाम सुरू करण्यासाठी कामगार व व्यवस्थापन कंबर कसली होती. पण व्यवस्थापन आणि ठराविक कामगार यांच्यात कुरकुर होती. यावर्षी दोनच दिवसांपूर्वी सुरू झालेला दौलत - अथर्व साखर कारखाना कामगारांनी सुमारे ३० तासाहून अधिक वेळ बंद पाडल्याचा आरोप अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे व कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने अथर्व  व्यवस्थापनाने प्रदीप सोनू पवार (रा. हेरे)  व अशोक शामराव गावडे  (रा. डुक्करवाडी) व इतर काही कामगाराविरोधात चंदगड पोलिसांत फिर्याद दिली आहे.

          कर्जाच्या खाईत सापडलेला कारखाना सात-आठ वर्षे बंद पडला होता.  गेल्या वर्षी पासुन अथर्व कंपनीने मोठे धाडस करून ३९ वर्षाच्या कराराने चालवण्यास घेतला. बंद असलेल्या अवस्थेत कारखाना राहिल्याने कोट्यावधी रुपये खर्चून सुरू करण्यात आला. काही कामगार आणि व्यवस्थापन  यांच्यात बदली  प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला. याचे पर्यवसान कारखाना बंद पाडण्यात झाले. कारखाना गती घेत असतानाच काही कामगारांनी केलेल्या या कृत्यावर नाराजी व्यक्त होत आहे.  

          दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २.२५ वाजता कारखाना बंद पडला. ऑइल वर्क अप करणारी मशीन बंद ठेवण्यात आल्याने इतर सर्वच मशीन्स बंद राहिल्या. याचा सुगावा लागू नये म्हणून तेथील सि सि टी व्ही कॅमेरे असलेल्या ठिकाणाची वीज दिवे बंद करण्यात आले असल्याचे व्यवस्थापनाला आढळले. यावरून यांत्रिकी बिघडाचे नेमके कारण समजण्यास मदत झाली. या नुकसानीला जबाबदार धरून प्रदीप सोनू पवार (रा. हेरे)  व अशोक शामराव गावडे  (रा. डुक्करवाडी) व इतर कामगारांनी संगनमताने कृत्य केल्याची तक्रार नोंदवली आहे. तसेच कारखान्यातील इतर प्रामाणिक कामगारांना भडकवणे, चिथावणी देणे, कामगारांमध्ये हेतुपरस्पर असंतोष पसरवून दुही माजवणे. कारखान्याची बदनामी करणे आदी तक्रारी काही मोजक्या कामगारांच्या विरोधात दिल्या आहेत. 

         कारखाना दोन दिवसांपासून बंद असल्याने  शेकडो वाहने कारखाना अड्ड्यावर उभी राहिली आहेत. कारखाना आवरासह हलकर्णी फाटा , धुमडेवाडी फाटा या रस्त्याच्या दुतर्फा उसाने भरलेली ट्रॅक्टर उभी होती. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या उसाचे उन्हांमुळे वजन घटले. याचा लाखों रुपयांचा फटका कारखाना आणि शेतकऱ्यांनाही बसला. सुरुवातच  अशी झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. हेमरस साखर कारखाना सुरू झाला नसल्याने या कारखान्याचीही वाहने काही दिवसांसाठी कामाला लागल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लांबच - लांब रांगा लागल्या होत्या.

          दरम्यान यासंदर्भात कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या आरोपांचे खंडन केले. कारखाना बंद पडावा असा आमचा हेतू नाही. कामगार संघटनेचे पदाधिकारी या नात्याने कामगारांच्या मागण्यांचे निवेदन दिले हा राग मनात धरून माझ्यावर व अशोक गावडेवर राग काढला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
5 comments:

Unknown said...

लोकांना खरं काय ते समजावं हि अपेक्षा . कारखाना तर चाललाच पाहिजेत .

Gundu vaiju Gadkari said...

अशा कृत्याने कोणाचेही भले होणार नाही सव॔जणानी चांगले विचार करून आपल्या तालुक्याचा योग्य विचार करावा.

Maddy said...

कारखाना चालू झाल्यामुळे चंदगड तालुक्याला सोन्याचे दिवस येणार आहेत, पण कामगारांनी हे समजायला पाहिजेत. आपली रोजीरोटी पाहिली पाहिजेत.

Unknown said...

कामगारांनी जास्त मेहनत घेऊन कारखान्याला गत वैभव मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावयास हवा.त्यातच त्यांचे व तालुक्याचे भले आहे.

Akshay Patil said...

Band padlela karkhana Appi Patil yani suru kela .

Post a Comment