हाजगोळी ते माडवळे दरम्यान बिबट्याचे दर्शन, जंगलातील प्रवेशासह जनावरे चरावयास सोडण्यावर बंदी - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2020

हाजगोळी ते माडवळे दरम्यान बिबट्याचे दर्शन, जंगलातील प्रवेशासह जनावरे चरावयास सोडण्यावर बंदी

बिबट्याचे संग्रहित छायाचित्र

कागणी : संदीप तारीहाळकर 

       हाजगोळी ते माडवळे रस्त्याच्या दरम्यान गुरुवारी रात्री आठ वाजता हाजगोळी येथील ॲड. जाधव यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट आहे. याबाबत वनविभागाने शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन केले आहे. सदर बिबट्या हा पूर्ण वाढ झालेला असून काही दिवसांपूर्वी   वनपाल नेताजी धामणकर यांनाही बिबट्याचे दर्शन झाले आहे. पाटणे रेंजचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल नेताजी धामणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाद्वारे परिसरातील गावांमध्ये जनजागृतीसह दवंडी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शुक्रवारपासून परिसरातील जंगलात नागरिकांना प्रवेश करणे तसेच जंगलात जनावरे सोडण्यावर निर्बंध घातले आहेत. वनरक्षक एम. आय. सनदी, सदाशिव तांबेकर, शेखर बोंद्रे, सुनीता गावडे, पूजा चव्हाण, वनमजूर नारायण गावडे, मनोहर मुतकेकर यांच्या पथकाद्वारे परिसरातील गावांमध्ये सुरक्षा मोहीम राबवण्यात येत आहे.  तुडये वनक्षेत्राला लागुनच पुढे तीलारीनगर, कळसगादे तसेच बेळगाव तालुक्यातील धामणे परिसरतील जंगलक्षेत्र लागून आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वन्यप्राण्यांचे दर्शन होत आहे. शेतकऱ्यानी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment