चंदगड तालुक्यात माध्यमिक अध्यापक संघामार्फत लाक्षणिक संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2020

चंदगड तालुक्यात माध्यमिक अध्यापक संघामार्फत लाक्षणिक संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार

                               
तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

          शिक्षक संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचारी विरोधी व नकारात्मक धोरणाच्या विरोधात देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपामध्ये चंदगड तालुका माध्यमिक संघ शंभर टक्के सहभागी होत असल्याचे चंदगड तालूका माध्यमिक संघाचे अध्यक्ष एस. एल. बेळगांवकर व जिल्हा प्रतिनिधी एस. डी. पाटील यांनी  स्पष्ट केले.

        केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशातील कामगार , कर्मचारी व शिक्षक देशव्यापी लाक्षणिक संपावर आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाच्या (फेडरेशन) आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ या संपामध्ये सहभागी असून चंदगड तालूक्यातील सर्व शिक्षक आजच्या संपामध्ये सहभागी असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र देसाई यांनी स्पष्ट केले.

       राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित विद्यालयांना, वर्ग व तुकडयांना शंभर टक्के अनुदान तातडीने अदा करावे, जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरावी, अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करणे, कामगार, कर्मचारी विरोधी कायदे रद्द करणे, शिक्षक व शिक्षकेत्तरांना विनाअट निवडश्रेणी देणे, मुदतपूर्व सेवानिवृतीचे जाचक धोरण रद्द करणे, राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३०, वर्षाची तीन लाभाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, अनुकंपा तत्वावरील नेमणूका विनाअट त्वरित भरणे.  यासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनने आपल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना देण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ चंदगडचे अध्यक्ष प्राचार्य आर. आय. पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या वतीने संपाला पाठींबा दिला आहे. तालूक्यातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आज २६ नोहेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता म.फुले विद्यालय व म. भ. तुपारे ज्युनि. कॉलेज कार्वे येथे माजी प्राचार्य ए. एस . पाटील यांचे संप व पुढील दिशा या विषयी मार्गदर्शन होणार आहे. तरी सर्वांनी शाळा बंद ठेवून सॅनिटायझर, मास्कसह सोशल डिस्टंटिंग राखून वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेमार्फत केले आहे.



No comments:

Post a Comment