अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरणार कधी? आरोग्य सुविधावर होतोय परिणाम - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2020

अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरणार कधी? आरोग्य सुविधावर होतोय परिणाम

अडकूर (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत. 

नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी

        अडकूर (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. कोरोना कालावधीत उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांची रूग्णांना सेवा देताना तारांबळ उडत आहे.

       अडकूर हे परिसरातील २५/३० खेड्यांची  बाजारपेठ आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत अडकूर, सातवणे आमरोळी, इब्राहिमपूर, बुझवडे हि पाच उपकेंद्र येतात. मात्र पंचवीस हजार नागरिकांना आरोग्य सेवा देताना उपलब्ध कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. डाॅक्टरसह, औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्ट), मुख्यालय आरोग्य सेविका, ४आरोग्य सेवक,१प्रयोगशाळा तत्रंज्ञ, १आरोग्य सेविका, ३ शिपाई अशी १२पदे रिक्त आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या दोन तीन कर्मचार्यानाच सर्व कामे करावी लागत आहेत. बऱ्याच वेळेला तर रूग्ण तपासून वैद्यकीय अधिका-यांनाच या रूग्णांना औषध गोळ्या द्याव्या लागत आहेत. सध्या अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅ. बी. डी. सोमजाळ हे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. कोरोनाची सुरवात झाल्यापासून या केंद्रात जवळपास २०हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे, मूंबई, कोल्हापूर सह बाहेरून आलेले रुग्णांची तसेच दैनंदिन येणा-या रुग्णांची तपासणी करताना तर डाॅ. सोमजाळ यांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरी अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांवर कर्मचार्याची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

      अडकूर हे बाजारपेठेचे गाव असलेने परिसरातील २५/३०खेड्यातील नागरिकांचा या आरोग्य केंद्राशी संपर्क येतो. वर्षभरात या आरोग्य केंद्रात चाळीस हजारांहून  अधिक रूग्णांची तपासणी केली जाते. रूग्ण तपासणी मध्ये अडकूर आरोग्य केंद्राचा जिल्ह्यात तिसरा क्रमांक लागतो. डाॅ.  सोमजाळ यांनी आपल्या कार्यामुळे या आरोग्य केंद्रांची नागरिकांत विश्वासहर्ता निर्माण केली आहे. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्यामुळे त्यांनाही काम करायला मर्यादा येत आहेत. 

         वैद्यकीय अधिकारी स्तरावरील पदाची मागणी  ही शासनाकडे केली जाते. आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहक, शिपाई या पदांची मागणी जिल्हा परिषदेकडे केल्यास रिक्त पदांवर नक्कीच कर्मचारी मिळू शकतात. मात्र यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी आपले कार्य कौशल्य दाखवण्याची गरज आहे.



No comments:

Post a Comment