पाटणे विभागाचे प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांना वनविभागातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुवर्ण पदक जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2020

पाटणे विभागाचे प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांना वनविभागातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुवर्ण पदक जाहीर

                                                                        दत्ता हरी पाटील

चंदगड / प्रतिनिधी

     राज्यातील वन, वन्यजीव संरक्षण व वन व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील जिगरबाज वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांना वन विभागातर्फे सुवर्णपदक जाहीर झाली आहेत. यामध्ये चंदगड तालुक्यातील पाटणे वनविभागाचे प्र. वनक्षेत्रपाल दत्ता हरी पाटील यांच्या वनविभागातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत सुवर्ण व रजत पदके जाहीर झाली आहेत. 

       वने व वन्यजीव व्यवस्थापन कार्यक्षेत्रात, निसर्गसंपदेचे संरक्षण करणे, वन गुन्हेगारी रोखणे, वन्यजीव रक्षण करणे, त्यासाठी तांत्रिक युक्‍त्यांचा अवलंब करणे, शोधकार्य करणे, अशी कामे वरील तिन्ही पदांवरील अधिकाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून केली आहेत. त्याची दखल घेऊन वन विभागाने पदके जाहीर केली. महाराष्ट्र शासन ने GR काढून वरील घोषणा केली. लवकरच शासन स्तरावर सुवर्ण पदक पुरस्कार वितरण होणार आहे.

     श्री. पाटील हे मूळचे घाटकरवाडी (ता. आजरा) येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. प्र. वनक्षेत्रपाल म्हणून काम करत असताना दत्ता पाटील (पाटणे, ता. चंदगड) यांनी चंदगड तालुक्यात येणाऱ्या हत्तींचे मार्ग शोधून काढले. हत्ती व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न केले. वन्यजीव व वनांचे मानवी जगण्यात असलेले महत्त्व याबाबत शाळा, महाविद्यालयांत प्रबोधन केले. प्रभारी वनक्षेत्रपाल म्हणून वन्यजीवांवरील हल्ले रोखण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर केला. त्यामुळे त्यांचा गौरव केला जाणार आहे. त्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लवकरच या पदकांचे वाटप होणार आहे. 
No comments:

Post a Comment