राज्यातील कंत्राटदारांची थकीत बिलांमुळे काळी दिवाळी, शासनाच्या निषेधार्थ राज्यभर उग्र आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2020

राज्यातील कंत्राटदारांची थकीत बिलांमुळे काळी दिवाळी, शासनाच्या निषेधार्थ राज्यभर उग्र आंदोलनाचा इशारा

चंदगड / प्रतिनिधी

        महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, नगरविकास खात्याचे मंत्री व अधिकारी यांच्या चालढकल वृत्तीमुळे राज्यातील विविध कामे केलेल्या कंत्राटदारांवर काळी दिवाळी साजरी करण्याची पाळी आली आहे. संबंधित विभागांच्या नाकर्तेपणा विरोधात कंत्राटदार संघटनेने राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

विविध विभागांकडे गेल्या आठ महिन्यांपासून कंत्राटदारांची प्रंचड मोठ्या प्रमाणात देयके प्रलंबित आहेत. याबाबत १६ विनंती पत्रे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने  दिली होती. मार्च २०२० मध्ये कोविड सुरू नसतानाही ते कारण पुढे करुन जाणीवपूर्वक छोट्या मोठ्या कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजुर सहकारी संस्था यांच्या देयकांसाठी निधी दिला नाही. यामुळे राज्यातील तीन लक्ष कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणारे घटक व कुटुबांची उपासमार व वाताहत झाली आहे. 

 जुन २०२० ला म्हणजे आठ महिन्यांनतर कंत्राटदार यांना त्यांच्या देयकेपोटी केवळ ५ ते ८ टक्के रक्कम देऊन कंत्राटदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सद्यस्थितीत राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जवळपास ३.५ हजार कोटी, ग्रामविकास विभाग  ७५० कोटी, नुसत्या २५१५  लेखाशिर्ष चे ४०० कोटी, नगरविकास विभाग चे २७०० कोटी, जलसंपदा विभाग ६७९ कोटी एवढ्या भंयकर प्रमाणात देयके प्रलंबित असताना  पगार,भत्ते,दौरे,इतर शासकीय दैनंदिन कामे मात्र व्यवस्थित पार पाडली जात आहे हा मोठाच विरोधाभास आहे.

छोट्या-मोठ्या कंत्राटदारांची बँका व वित्तीय संस्थांची बीले भागवतांना देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. असे असताना शासन मोठ्या कंपन्यांना मात्र मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे हे निषेधार्ह आहे.

 कंत्राटदारांची देयके दिवाळीपूर्वी न दिल्यास राज्यभर २५ नोव्हेंबर पासुन पहिल्यांदा स्थानिक स्तरावर  काम बंद आंदोलन, शासकीय कार्यालयास टाळे ठोकून किया उपोषण मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे. हिवाळी अधिवेशनावर मोर्चा आदी उग्र आंदोलने करण्याचा इशारा कंत्राटदार महासंघाने निवेदनाद्वारे दिला आहे. याच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलसंपदा, नगरविकास मंत्री, राज्यपाल आदींना दिल्या आहेत.

निवेदनावर राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, कार्याध्यक्ष संजय मैंद, महासचिव सुनील नागराळे, मार्गदशक निवास लाड, पश्चिम विभागीय अध्यक्ष सुरेश कडु पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल पाटील, विदर्भीय विभागीय अध्यक्ष सुबोध सरोदे, कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश पालरेचा,उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रकाश पांडव, मुंबई ठाणे विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे प्रसिध्द प्रमुख कौशिक देशमुख आदींच्या सह्या आहेत.





No comments:

Post a Comment