चंदगड मतदारसंघातील पाटबंधारे दुरूस्तीसाठी निधी मंजूर - आमदार राजेश पाटील यांची माहीती, किती बंधाऱ्यासाठी निधी मंजूर? - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2020

चंदगड मतदारसंघातील पाटबंधारे दुरूस्तीसाठी निधी मंजूर - आमदार राजेश पाटील यांची माहीती, किती बंधाऱ्यासाठी निधी मंजूर?

                          अडकूर - गणूचीवाडी येथील बंधारा दुरूस्ती कामाचा शुभारंभ करताना आमदार राजेश  पाटील, कार्यकारी अभियंता सिमा माने

अडकूर - सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड तालुक्यात गत वर्षी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत फाटकवाडी धरणाचा रिटेनिंग व्हाल पडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते.  त्यावेळी मतदारसंघातील सर्व  बंधाऱ्यांच्या दुरुस्ती संदर्भातील प्रश्नासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपूरवा केला होता. त्यातून चंदगड मतदारसंघातील कोल्हापूर पद्धतीचे एकूण १४ बंधारे दुरुस्तीसाठी सरकारकडून साडेतीन कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्यातून पाठबंधारे विभागाची सर्व कामे केली जाणार असल्याचे मनोगत  आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले .
      याच विकासकामातून आजअडकूर-गणूचीवाडी  ( ता. चंदगड) बंधारा दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. या कामाचा  शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला . त्यावेळी आम. पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला पाठबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सिमा माने, उपअभियंता बाबूराव पाटोळे, शाखा अभियंता तुषार पवार, पांडूरंग अर्जुनवाडकर, अडकूरचे कालवा निरीक्षक रणजित गरुड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय अध्यक्ष अभय देसाई, गणुचीवाडी सरपंच शोभा भादवणकर, अडकूर सरपंच यशोधा कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती गोविंद सावंत आदि मान्यवर उपस्थित होते .  प्रथम आमदार पाटील यांचा सत्कार आनंदा आर्दाळकर व सरपंच शोभा भादवणकर यांनी केला तर कार्यकारी अभियंता सीमा माने यांचा सत्कार सरपंच यशोदा कांबळे यांनी केला.

        यावेळी आमदार राजेश पाटील पुढे बोलताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकार विकास कामासाठी तत्पर आहे. कोरोना काळात काही कामे करता आली नसली तरी मतदारसंघातील सर्व पाठबंधारे विभागाची दुरुस्तीची कामे या साडेतीन कोटी रुपये निधीतून केली जाणार आहेत. त्याचबरोबर पाटणे फाटा येथील ट्रॉमा केअर केंद्राचे काम लवकरच सुरु होईल, हेरे सरंजामचा प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मतदार संघाच्या विकासासाठी मी प्रयत्नशील असून आपण सर्वानी मला साथ द्यावी .
            शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  १२ डिसेंबरला चंदगड येथील सोयरीक मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले आहे. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा असून या संकटकाळात आपण सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहनही आमदार राजेश पाटील यांनी केले.
 गडहिंग्लज बाजार समितीचे प्रशासकीय अध्यक्ष अभय देसाई बोलताना म्हणाले , अडकूर विभाग सदैव आमदार राजेश पाटील यांच्या पाठीशी राहील . या निभागाने मताधिक्य कमी दिले असले तरी विकास कामात कोणतेही राजकारण न आणता आमदार राजेश पाटील यानी आपल्या विकास कामांची सुरवात याच बंधाऱ्याच्या दुरुस्ती ने केल्याने या मतदार संघातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत आहे . त्यामूळे परिसरातील सर्वानी विकास कामे करणाऱ्या आमदार पाटील याना साथ देण्याचे आवाहन केले .
        यावेळी आमदार पाटील यांचा सत्कार गणूची वाडी सरपंच शोभा भादवणकर व अशोक आर्दाळकर यांच्या हस्ते झाला . कार्यक्रमाला अडकूरचे  सरपंच श्रीमती यशोधा कांबळे यांच्यासह परिसरातील गावातीत ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अशोक आर्दाळकर, सूत्रसंचालन दिलिप भेकणे यानी केले तर आभार अभय देसाई यांनी मानले.

No comments:

Post a Comment