किटवाड येथील अनाथ बालकांना कालकुंद्री ग्रामस्थांकडून अडीच लाखांचा 'आधार निधी' - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2020

किटवाड येथील अनाथ बालकांना कालकुंद्री ग्रामस्थांकडून अडीच लाखांचा 'आधार निधी'

किसन बिर्जे यांची अनाथ मुले व आजीकडे ठेव पावत्या देताना कालकुंद्री ग्रामस्थ व मुंबई ग्रामस्थ मंडळ चे पदाधिकारी.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       किटवाड येथील आई वडिलांचे छत्र हरपलेल्या कुणाल व काजल या अनाथ मुलांना कालकुंद्री ग्रामस्थ व कालकुंद्री ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी अडीच लाखांचा आधार निधी किटवाड येथे जाऊन नुकताच सुपूर्त केला.
       मूळचा चव्हाट गल्ली बेळगाव येथील किसन बिरजे हा आई-वडिलांचे छत्र अकाली हरपल्याने आजोळी कालकुंद्री येथे वाढला होता. अपंग शरीरयष्टी असणाऱ्या किसन चा विवाह किटवाड येथील मालन जाधव या मूकबधिर मुलीशी झाला. तिलाही भाऊ नसल्यामुळे मालनची आई श्रीमती आवाका गणपती जाधव हीने किसन याला मुलगा समजून तिथेच राहण्याची विनंती केली केल्याने तो किटवाडचा रहिवासी झाला. या दांपत्याला कुणाल व काजल ही मुले झाली. दरम्यान चार वर्षांपूर्वी किसन याचे आजारपणामुळे निधन झाले. तेव्हापासून मूकबधिर मालन मोलमजुरी करून दोन्ही मुले व आईचे पालनपोषण करत होती. मोठ्या कष्टाने पण समाधानात चाललेल्या कुटुंबावर नोव्हेंबर महिन्यात अस्मानी संकट कोसळले.  कुटुंबाच्या गाड्याची सर्वच चाके असलेल्या मालनचे मजुरीसाठी शेतावर जाताना अपघाती निधन झाले. आणि तिच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांसह वृद्ध आईची वाताहत सुरू झाली.
        याबद्दल चे वृत्त विविध वृत्तपत्रे व पोर्टल चॅनेलवर झळकताच चंदगड तालुका व जिल्ह्यातील  दानशूर व्यक्ती, संस्था, मंडळांनी विविध स्वरूपात मदतीचा हात पुढे केला.
      या सत्कार्यात कालकुंद्री ग्रामस्थ मागे राहणे शक्य नव्हते. गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन मदतीचे आवाहन करताच गावासह देश-विदेशात राहणारे ग्रामस्थ आर्थिक मदतीसाठी सरसावले. गावातून ९० हजार तर ग्रामस्थ मंडळ मुंबई चे पदाधिकारी रामराव पाटील, श्रीकांत द. पाटील, पांडुरंग कोकितकर आदींच्या प्रयत्नातून एक लाख 55 हजार रुपये असा एकूण अडीच लाखांचा निधी जमा झाला. तर काही ग्रामस्थांनी थेट वैयक्तिक निधी दिला. ही रक्कम नुकतीच किटवाड येथे जाऊन ग्रामस्थ मंडळ मुंबई चे पदाधिकारी गावातून निधी जमवण्यासाठी पुढाकार घेतलेले गजाभाऊ पाटील, के जे पाटील, सुरेश नाईक, पांडुरंग गायकवाड, रामचंद्र खवणेवाडकर, सुभाष पाटील व गावातील शिक्षक आदींच्या उपस्थितीत ठेव पावत्यांच्या स्वरूपात मुले व आजी यांच्या हाती सुपूर्त केला. यावेळी किटवाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेहमी आजारी असणारी काजल सद्ध्या चौथीत शिकत असून आठवीत शिकणाऱ्या कुणालची दहावी व त्यापुढील शिक्षणाचीही जबाबदारी किणी येथील जयप्रकाश विद्यालयाने स्वीकारली आहे. विविध ठिकाणावरून मदतीचा ओघ अजूनही सुरू असून केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड चे मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांनी केंद्राच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे.


No comments:

Post a Comment