सिंधुदुर्ग ठरला राज्यातील आदर्श जिल्हा पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2020

सिंधुदुर्ग ठरला राज्यातील आदर्श जिल्हा पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार जाहीर

मुंबई / प्रतिनिधी  

          आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचं स्मारक व्हावं यासाठी सतत पंचवीस वर्षे पाठपुरावा करून  स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार्‍या सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाला यंदाचा मानाचा समजला जाणारा रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राज्यात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या जिल्हा संघाला दरवर्षी हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.मानपत्र,स्मृतीचीन्ह आणि शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.फेब्रुवारीत पालघर जिल्हयात होणार्‍या कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे..

     महाराष्ट्रात परिषदेशी संलग्न असलेल्या जिल्हा संघांच्यावतीने  पत्रकारांच्या हक्काचे तसेच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत अनेक उपक्रम राबविले जातात.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान परिषदेच्यावतीने करण्यात येतो.यापुर्वी नाशिक,भंडारा,नांदेड,पुणे आदि जिल्हयांना परिषदेच्यावतीने गौरविण्यात आले आहे.यंदाचा हा पुरस्कार पत्रकारांची पंढरी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघास जाहीर करण्यात आला आहे.सिंधुदुर्ग ही बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी आहे.आचार्य जांभेकर यांच्या जन्मभूमीत त्याचं स्मारक व्हावं यासाठी जिल्हा पत्रकार संघ गेेली पंचवीस वर्षे पाठपुरावा करतो आहे.अखेर जिल्हा संघाच्या या प्रयत्नास यश आले असून स्मारक लवकरच पूर्णत्वास जात आहे.परिषदेने सिंधुदुर्ग जिल्हयाचा सन्मान करताना तयांनी केलेल्या या कामाची दखल घेतली आहे.
     एवढेच नव्हे तर जिल्हा संघाच्यावतीने इतरही विविध उपक्रम राबविण्यात येतात.जिल्हा संघानं मागील डिसेंबरमध्ये परिषदेची कार्यशाळा घेतली,जिल्हा स्तरावर सातत्यानं कार्यशाळा घेतल्या जातात,गरजू पत्रकारांना मदतीचा हात देण्याचे,कोरोना काळात पत्रकारांना मदतीचे अनेक उपक्रम जिल्हा संघानं राबविले आहेत.नियमित निवडणुका,चोख आर्थिक व्यवहार,नियमित बैठका घेऊन संघटन शक्ती वाढविण्याचं काम जिल्हा ंसंघानं केलं आहे.त्यामुळे जिल्हयातील 90 टक्के पत्रकार जिल्हा संघाबरोबर जोडलेले आहेत.एक आदर्श जिल्हा संघ म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा संघाचे काम सुरू असल्याने परिषदेने सिंधुदुर्गची निवड केली आहे.या पुरस्काराबदादल परिषदेचे अध्यक्ष आणि सिंधुदुर्गचे सुपूत्र गजानन नाईक आणि जिल्हा संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे एस. एम. देशमुख विश्‍वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील, प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment