शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधासाठी पाटणे फाटा येथे मंगळवारी आंदोलन, महाविकास आघाडीसह अन्य संघटनांचा पाठींबा - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2020

शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधासाठी पाटणे फाटा येथे मंगळवारी आंदोलन, महाविकास आघाडीसह अन्य संघटनांचा पाठींबा

चंदगड / प्रतिनिधी 

     भारत सरकारने पारित केलेली तीन कृषी विधेयके रद्द करा. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीपासून ते संपूर्ण देशात उद्या (ता. 8) भारत बंदचे आवाहन केले आहे. त्याला चंदगड तालुक्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. या अंदोलनला महाविकास आघाडीनेही पाठिंबा दर्शविला आहे. उद्या मंगळवार  ८ डिसेंबर रोजी  सकाळी ११ वाजता पाटणे फाटा येथे या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन व निदर्शने करण्यात येणार असल्याची माहीती राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजीराव शिरोलीकर यांनी दिली.

         पाटणे फाटा, कोवाड, हलकर्णी, चंदगड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा संघटना, , शेतकरी कामगार पक्ष, प्रहार संघटनेसह विविध संघटनांनी आंदोलन, निवेदने, निदर्शने करणार असून भारत बंदला पाठिंबा दिला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीनेही चंदगड तालुक्यात पाटणे फाटा येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

     बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांनी भारत बंदच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असून उद्या होणाऱ्या भारत बंदमध्येही सहभागी असून उद्या आम्ही चंदगड येथे तहसीलदारांना ही कृषी विधेयके रद्द करण्याबाबतचे निवेदन देणार असल्याचे सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी उद्याच्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी संघटना सहभागी असून आम्ही पाटणे फाटा, चंदगड, कोवाड येथे निदर्शने करणार आहोत. 

            तर उद्याच्या शेतकरी आंदोलन व भारत बंदला कोवाड येथील व्यापारी संघटनेने देखील पाठिंबा दर्शवला आहे. कोवाड बाजारपेठ उद्या बंद असल्याने नागरिकांनी याची नोंद घेऊन या शेतकऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.




No comments:

Post a Comment