जंगमहट्टी धरणावर ओल्या सुक्या पार्ट्यांना ऊत, पर्यटनाच्या नावाखाली युवकांची हुल्लडबाजी - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2020

जंगमहट्टी धरणावर ओल्या सुक्या पार्ट्यांना ऊत, पर्यटनाच्या नावाखाली युवकांची हुल्लडबाजी

जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील धरण परिसरात दररोज अशा ओल्या पार्ट्याना ऊत आला आहे. 

चंदगड / प्रतिनिधी :-- (नंदकुमार ढेरे)

     नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक भेट देत असलेल्या जंगमहट्टी प्रकल्प परिसरातील पर्यटनास आता गालबोट लागू लागले आहे. पर्यटनाऐवजी हा परिसर सध्या तरुणांचा 'ओपन बार' झाला आहे. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या परिसरात ओल्या-सुक्या पार्ट्यांना ऊत आला आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. हुल्लडबाज तरुणांच्या वावरामुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे.

निसर्गरम्य असा जंगमहट्टी धरणाचा परिसर

        


हिरव्या गर्द झाडीने नटलेल्या डोंगर दऱ्या आणि मध्यभागी असलेले जंगमहट्टी प्रकल्प पाहण्यासाठी  पर्यटक या परिसरास रोज भेट देत असतात. कोरोना काळात गेल्या सात महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद असलेला हा परिसर १ नोव्हेंबरपासून पुर्ववत सुरू झाला आहे. सुट्टयांमुळे हा परिसर सध्या गजबजून गेला होता. जंगमहट्टी  धरणालगत  ऐतिहासिक किल्ले कलानंदीगड  परिसर आहे. या ठिकाणाहून विना अट व शर्थीशिवाय धरण क्षेत्रात प्रवेश करता येतो. धरणाच्या पायथ्याला दाट झाडीत ओल्या - सुक्या पार्ट्या रात्र-दिवस चालतात. मद्यधुंद अवस्थेत तरुणाईचे नाचगाणे व बीभत्स चाळे नित्याने सुरू असतात.  या परिसरात चंदगड पोलीस प्रशासनाच्या वतीने कधीही पेट्रोलिंग होत नाही. अनुचित प्रकार घडण्याआधीच पोलीस प्रशासनाने जागे होण्याची गरज आहे. जंगमहट्टी प्रकल्पावरील मद्यधुंद, दंगेबाज, मस्तवाल, उपद्रवी पर्यटकांची हुल्लडबाजी चंदगड पोलीस व पाटबंधारे खात्याने त्वरीत थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 


         प्रत्येक  शनिवार व रविवारी कर्नाटक, महाराष्ट्रातील मद्यधुंद पर्यटक हजारोंच्या संख्येने जंगमहट्टी प्रकल्पावर नंगानाच घालत आहेत. मद्याच्या बाटल्या तिथेच फोडून टाकत आहेत. पत्रावळ्या तिथेच टाकत आहेत. दारूच्या नशेत जलाशयात पोहण्याचा पराक्रम केला जात आहे. आतापर्यंत पाच जणांचा जलाशयात पडून मृत्यू झाला आहे  त्यामुळे प्रत्येक शनिवार, रविवार जंगमहट्टी प्रकल्प स्थळांवर पोलिसांनी प्रकल्पाकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अडवून तपासणी करावी. विष्णू गावडे (सरपंच, जंगमहट्टी)

No comments:

Post a Comment