द्वारका (गुजरात) येथे महाराष्ट्र भवन- भक्त निवास इमारत बांधकाम शुभारंभ, वाचा कोण करतय हे काम? - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2020

द्वारका (गुजरात) येथे महाराष्ट्र भवन- भक्त निवास इमारत बांधकाम शुभारंभ, वाचा कोण करतय हे काम?

 

                      द्वारका (गुजरात) येथील नियोजित महाराष्ट्र भवन भक्तनिवास इमारत.

चंदगड (प्रतिनिधी)

          श्रीकृष्णाची राजधानी देवभूमी द्वारका (गुजरात राज्य) येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास तथा 'महाराष्ट्र भवन' बांधकामाचा शुभारंभ नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


      देवभूमी द्वारका येथे विविध जाती, धर्म, पंथाच्या भाविकांना तेथे गेल्यानंतर राहण्यासाठी त्या-त्या समाजाने टोलेजंग भक्तनिवास बांधून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तथापि महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी हक्काचे ठिकाण नव्हते. ही उणीव दूर करण्यासाठी अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळ तसेच  महाराष्ट्र मंडळ द्वारका व महाराष्ट्रातून उद्योग-व्यवसाय व नोकरीनिमित्ताने गुजरात मध्ये स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी हे शिवधनुष्य उचलले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून द्वारका येथे मिल कामगार म्हणून गेलेल्या चाकरमान्यांनी चाळीस वर्षांपूर्वी पै पै जमवून द्वारकेत जागा खरेदी केली होती. त्यावर आता 'महाराष्ट्र मंडळ द्वारका' या रजिस्टर्ड  विश्वस्त मंडळामार्फत बांधकाम करण्यात येत आहे. अखिल सौराष्ट्र महाराष्ट्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष राजेश कल्लाप्पा पाटील (मोरबी, गुजरात) हे कोल्हापूर जिल्ह्यातील कालकुंद्री ता. चंदगडचे असून ते द्वारका विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष ही आहेत. अत्याधुनिक सुविधा युक्त महाराष्ट्र भवन- भक्त निवास उभारणीसाठी पाटील यांच्या सह अध्यक्ष सुरेश सोनार (सुरत), सचिव एल डी वाघमारे,  उपाध्यक्ष सुशील कोरेगावकर (राजकोट) नारायण गद्रे, विवेक बुचके (जामनगर), मनीष परळीकर (राजकोट), एन व्ही वरे, मानसिंग पवार (आमरेली),  आदी विश्वस्तांसह गुजरात मधील मराठी बांधवांची अहोरात्र धडपड सुरू आहे.

           गुजरात मध्ये नोकरी, उद्योग, व्यवसाय साठी गेलेल्या मराठी बांधवांना मोठा आधार देण्याचे व त्यांचे संघटन करण्याचे कार्य अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळाच्या झेंड्याखाली विविध जिल्हा मंडळांनी चालवले आहे. त्याला महाराष्ट्रातून बळकटी देण्याची ची गरज निर्माण झाली आहे.

         द्वारका महाराष्ट्र भवन हे महाराष्ट्र व मराठी बांधवांची अस्मिता ठरणार असून याला सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी दिल्या जाणाऱ्या देणग्यांना '८० जी' अंतर्गत कर सवलत मिळणार आहे.  यानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राजेश पाटील हे जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्र भवन बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


आपले दान 'महाराष्ट्र मंडल द्वारका' च्या  नावा ने करावे.

 SBI A/C No.36319363616 IFSC Code : SBIN0060090

'80 जी' अंतर्गत देणगीची पावती देणगीदारापर्यंत पोहोचवली जाणार आहे.

Mob9426467369

Sachiv

ट्रस्टी मंडळ

महाराष्ट्र मंडळ - द्वारका
No comments:

Post a Comment