वृक्षांना मान्यवर पत्रकारांची नावं देण्याचा एस.एम.देशमुख यांचा उपक्रम प्रशंसनीय - अजित कुंभार - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2021

वृक्षांना मान्यवर पत्रकारांची नावं देण्याचा एस.एम.देशमुख यांचा उपक्रम प्रशंसनीय - अजित कुंभार

वृक्षांना पत्रकारांची नावे देताना एस. एम. देशमुख व इतर मान्यवर.

बीड : प्रतिनिधी

          वृक्षारोपणाचे कार्यक्रम अनेक होतात मात्र वृक्षांना मान्यवर पत्रकारांची नावं देऊन त्यांच्या स्मृती जतन करण्याचा अनोखा उपक्रम एस.एम.देशमुख यांनी राबविला, हे कार्य अभिनंदनीय असल्याचं प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी  केले..

         मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आपल्या देवडी येथील झाडांना मराठीतील ५० मान्यवर पत्रकारांची नावं देण्याचा उपक्रम आज पत्रकार दिनी देवडी येथील आपल्या फार्मवर आयोजित केला होता.. त्यावेळी अजित कुंभार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंपावतीपत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर होते..

         बीड जिल्हयातील पत्रकारांनी कोविड काळात केलेल्या कार्याची अजित कुंभार आपल्या भाषणात प़शंसा केली.. या कार्यक्रमात देवडी येथील प़गतीशील शेतकरी नारायण सातपुते आणि गोरख झाटे यांचा अजित कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. त्याचा संदर्भ घेउन कुंभार यांनी अनेक अडचणींवर मात करून बीड जिल्हयातील शेतकरयांनी शेती उत्पादन वाढीसाठी भरीव योगदान  दिल्याचे त्यांनी सांगितले..

          अध्यक्षीय समारोप करताना नामदेवराव क्षीरसागर यांनी देशमुख यांनी वृक्षांना दिवंगत पत्रकारांची नावं देण्याचा जो उपक़म घेतला तो राज्यातील अशा पध्दतीचा पहिलाच उपक्रम असल्याचे स्पष्ट केले..

          प्रारंभी एस.एम.देशमुख यांनी प्रास्ताविक करून वृक्ष नामकरणा मागची भूमिका स्पष्ट केली... मान्यवर पत्रकारांचे कायम स्मरण राहावे यासाठी आपण नामकरणाचा उपक़म हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील हा पहिलाच प़यत्न असून दुसरया टप्प्यात आणखी 50 झाडांना पत्रकारांची नावं देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले..

          यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, राम कुलकर्णी आदिंची भाषणं झाली.. बीड जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे यांनी आभार मानले तर अनिल वाघमारे यांनी सूत्र संचलन केले..यावेळी ग़ामीण राहून पत्रकारिता करणारे सुभाष वाव्हळ आणी सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला.. अजित कुंभार आणि नामदेवराव क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात दोन झाडांना नावाच्या पाट्या लावून वृक्षांचे नामकरण करण्यात आले. 

        कार्यक्रमाला पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर आणि पुणे शहर सचिव सुनील वाळुंज तसेच बीड जिल्ह्य़ातील पत्रकार उपस्थित होते.



No comments:

Post a Comment