उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ उपक्रमास मोठा प्रतिसाद प्रलंबित ३६३५ पैकी २७६४ प्रकरणे उपक्रमाआधीच निकाली, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2021

उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ उपक्रमास मोठा प्रतिसाद प्रलंबित ३६३५ पैकी २७६४ प्रकरणे उपक्रमाआधीच निकाली, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती



कोल्हापूर/प्रतिनिधी :--- ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ हा अभिनव उपक्रम जाहीर केल्यानंतर हा पहिला कार्यक्रम होण्यापूर्वीच विभागांतर्गत प्रलंबित असलेल्या ३६३५पैकी सुमारे २७६४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. विशेषतः १७ पैकी १० व्यक्तींना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहात आज सकाळी ‘उच्च शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या उपक्रमास प्रारंभ झाला. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आलेलो असल्याने कोणत्याही प्रकारचे स्वागत वगैरेची औपचारिकता स्वीकारणार नाही, अशी भूमिका स्पष्ट करून यावेळी उपस्थित असलेल्या शैक्षणिक क्षेत्राशी निगडित विविध घटकांना संबोधित करून मंत्री श्री. सामंत यांनी वेळ न दवडता थेट निवेदकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यास सुरूवात केली.

यावेळी मंत्री श्री. सामंत म्हणाले, ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाची येथून सुरुवात करण्यात येत आहे. हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सातवा वेतन आयोग अथवा वेतन निश्चितीच्या २३८ प्रकरणांपैकी २२० प्रकरणे निकाली निघाली आहेत. अनुकंपा तत्त्वावरील ४१ प्रकरणे आली होती, त्यातील ३४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. वेतन देयकात नाव समाविष्ट करण्याबाबत ८५ प्रकरणे प्राप्त झाली होती, त्यातील ८० निकाली निघाली आहेत. सेवानिवृत्ती वेतनाची ५३५ प्रकरणांपैकी ४९२ प्रकरणे निकाली निघाली आहेत. सेवानिवृत्ती उपदानाच्या ४०८ प्रकरणांपैकी ३४१ प्रकरणे निकाली निघाली आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीची १४६ प्रकरणे प्रलंबित होती, त्यापैकी ९६ निकाली निघाली आहेत. अर्जित रजा रोखीकरणाच्या ५५ पैकी ४३ निकाली निघाली आहेत. भविष्य निर्वाह निधीच्या ४९०पैकी ४३३ निकाली, स्थाननिश्चितीच्या ६४७ पैकी ४८५ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यांसह तात्पुरते सेवा निवृत्ती वेतन, वैद्यकीय देयके यासंदर्भातील प्रलंबित प्रकरणेही मार्गी लागल्याचे मंत्री श्री सामंत यांनी सांगितले.

सीमाभागात शैक्षणिक संकुल सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाने सकारात्मक पद्धतीने प्रयत्न केल्याचे सांगून मंत्री उदय सामंत म्हणाले, या शैक्षणिक संकुलास मूर्त स्वरुप येत असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी दहा एकर जागा निश्चित करून देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार आता तेथे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रारंभ करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिक्षण घेता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी सीमाभागात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची तीन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनासाठीचे उपक्रम राबविण्याचे नियोजन येत्या काळात केले जाईल. विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्रासाठी जाहीर केलेला एक कोटी रुपयांचा निधी येत्या १५ दिवसांत प्रदान करण्यात येईल. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अध्यासन सुरू केले जाणार आहे. याला कुलगुरू, कुलसचिव यांनी संमती दिल्याचेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. 

सुरूवातीला उच्चशिक्षण विभागाचे पुणे विभागीय संचालक डॉ. धनराज माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ पी गुप्ता यांच्सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment