कालकुंद्री किटवाड व कुदनूर किटवाड रस्त्यांना अच्छे दिन कधी येणार? - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2021

कालकुंद्री किटवाड व कुदनूर किटवाड रस्त्यांना अच्छे दिन कधी येणार?

 

काही वर्षापूर्वी डांबरी असलेल्या कुदनर - किटवाड रस्त्याची झालेली दुरावस्था.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
           धरण आणि धबधब्यांमुळे पर्यटनासाठी चर्चेत आलेल्या किटवाड ता. चंदगड गावाकडे  कुदनूर व कालकुंद्री हून जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे बाजारहाट बँक आदी कामांसाठी जाणारे ग्रामस्थ, विद्यार्थी, आजारी रुग्ण, यांच्यासह पर्यटकांचीही मोठी कुचंबणा होत आहे.
        पंचवीस वर्षांपूर्वी कृष्णा खोरे विकास योजनेतून शिवसेना-भाजप शासन काळात किटवाड परिसरात कालकुंद्री हद्दीत नंबर एक तर कुदनूर हद्दीत नंबर दोन अशी धरणे झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षे रस्त्यांच्या बाबतीत दुर्लक्षित राहिलेल्या किटवाड ला धरणांमुळे बारमाही वाहतुकीसाठी रस्ते होतील ही अपेक्षा मात्र फोल ठरली. वीस वर्षांपूर्वी कुदनूर- किटवाड रस्ता डांबरीकरण झाला होता. तथापि सद्यस्थितीत त्याचे कोणतेच अस्तित्व शिल्लक नाही.  तीस फूट रुंदी असलेला रस्ता दोन्हीकडील अतिक्रमणामुळे दहा फुटावर आला आहे. तर ओढ्यातील पाणी शेतीला देण्यासाठी पाइपलाइनच्या पन्नास ते साठ चरी या रस्त्यावर मारून रस्त्याच्या दूर्दशेत आणखी भर घातली आहे. किटवाड कडे जाण्यासाठी कुदनूर सह कालकुंद्री, होसुर व कर्नाटक मधील हांदिगनूर हून रस्ते आहेत. चारही मार्गांचे प्रत्येकी अंतर चार किलोमीटर असून यातील केवळ होसुर पासून चा रस्ता काहीसा सुस्थितीत आहे. पैकी सर्वाधिक वाहतूक असलेल्या कालकुंद्री रस्त्याचीही पूर्ण दुर्दशा झाली असून किटवाड नजीक एक किलोमीटर अंतराचा मार्गच अस्तित्वात नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन कुदनूर व कालकुंद्री ते किटवाड हे दोन्ही रस्ते रुंदीकरणासह नव्याने डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment