युवा उमेदवारांकडून प्रस्थापितांवर मात, कौलगे ग्रामपंचायतीमध्ये तरुणांच्या एकजुटीचा विजय - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2021

युवा उमेदवारांकडून प्रस्थापितांवर मात, कौलगे ग्रामपंचायतीमध्ये तरुणांच्या एकजुटीचा विजय

 कौलगे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारासह प्रमुख कार्यकर्ते.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा 

     राज्यभरातल्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणमधुमाळी नुकतीच पार पडली. चंदगड तालुक्यातील कौलगे ग्रामपंचायतीचा निकाल विकासाचे ध्येय घेऊन राजकारणात नव्याने उतरलेल्या तरुणांच्या बाजूने लागला असून गेल्या 40 वर्षांची परंपरा युवकांनी मोडीत काढली आहे. 
        एकूण 7 सदस्य असणाऱ्या या ग्रामपंचायतीची निवडणूक यावेळी तरुणांनी पुढाकार घेऊन श्री हनुमान युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून लढवली होती. त्यातील सर्वच जागांवर युवकांच्या या पॅनलने बाजी मारलीय. विकासकामांचे नवे मुद्दे आणि गावकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर तरुणांनी हे अभूतपूर्व यश मिळवलेल आहे. लॉकडाऊन कालावधीत कौलगे गावातील अनेक तरुणांनी अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला होता. त्यामुळे गावातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करून बदल हवा असल्यास या प्रवाहात स्वतः उतरणे गरजेचे आहे. हा तरुणांनी संकल्प केला आणि यावेळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एक जागा बिनविरोध होताच उर्वरित 6 जागेंवर चुरशीची लढत झाली आणि सर्व जागांवर युवकांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक 1 मधून सौ. साधना मनोज मुतकेकर आणि सौ. पूजा मल्लाप्पा आतवाडकर, प्रभाग क्रमांक 2 मधून सौ. सरोज दशरथ आतवाडकर आणि संजय कलाप्पा पाटील हे निवडून आले असून प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रकाश मारुती केदनुरकर आणि सौ.अरुंधती दशरथ पाटील हे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झालेत. येत्या काळात कौलगे गावातील बदलासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी विजयी उमेदवारांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

No comments:

Post a Comment