खड्डे खोदता - खोदता फुलवले सहा मुलांचे आयुष्य, हडलगे येथील 'गुलाब व शेवंताची` अजब कहाणी, वाचा त्यांचा जीवनसंघर्ष? - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2021

खड्डे खोदता - खोदता फुलवले सहा मुलांचे आयुष्य, हडलगे येथील 'गुलाब व शेवंताची` अजब कहाणी, वाचा त्यांचा जीवनसंघर्ष?

 

        शेवंता राठोड        गुलाब राठोड

तेऊरवाडी / एस. के. पाटील

        अनेकजन जीवनात संकट आले की त्या संकटाना घाबरून लोटांगण घालतात. पण अशा अनेक संकटांशी धैर्याने सामना करत एक-दोन नव्हे तर चक्क सहा मुलीनां व एका मुलाला जन्म तर दिलाच. पण या सर्व मुलींना उच्च शिक्षणही दिले. लमान जातीचा अभिमान बाळगत खड्डे खोदता - खोदता आपल्या सहा मुलींचे आयुष्य फुलवणाऱ्या हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील गुलाब व शेवंता राठोड या कुंटूंबाची अजब अशीच कहाणी आहे. `बेटी बचाओ, बेटी पढाओ` या शासनाच्या आदेशाचे जनू तंतोतंत पालन करणाऱ्या आणि याला साथ देत उच्च शिक्षण घेणाऱ्या या सर्व मुली खरोखर कौतुकाला पात्र आहेत.
                  गुलाब व शेवंता आपल्या मुली व मला सोबत
        हडलगे येथे लमान समाजातील गुलाब पांडुरंग राठोड (मूळ गाव सातीहाल, ता. बसवन बागेवाडी, जि. विजापूर) पत्नी शेवंतासह राहत आहेत. गावातील रस्ते, खड्डे खुदाई, पाईपलाईन चर खुदाई आदि कामे दोघे पतिपत्नी करतात. परि स्थिती अंत्यत गरीबीची, त्यातच सहा मुली व एक मुलगा. या सर्वाना अहोरात्र काम करतच शाळेचा रस्ता दाखवला. काबाडकष्ठ करतच सहा मुलीना उच्च शिक्षण दिले. यातील एक मुलगी समुदाय आरोग्य अधिकारी, एकटी आरोग्य सहाय्यक आणि एक मुलगी खासगी नोकरी करत आहेत. घरी सर्व मलीच असूनही दुःखी न होता कष्टाच्या जोरावर सर्वाना उच्च शिक्षण देणाऱ्या गुलाब व शेवंता खरच कौतुकास पात्र आहेत.
         जवळपास ३० वर्षापूर्वी हे कुटुंबीय हडलगे येथे आले. येथे राहताना नऊ जनांचे कुटुंब सांभाळताना ओढातान होत होती. पण दिवसभर रस्त्याचे काम करायचे व रात्री पाईपलाईन व घरांच्या पायांची खुदाई करून या दोघा पतीपत्नीनी मुलींच्या शिक्षणासाठी सोय केली. यातील पहिली मुलगी बबिता सातवीपर्यंत, दुसरी सविता हिने पदवीबरोबरच ग्रामसेविका कोर्स पूर्ण केला आहे. तिसरी वनिता व चौथी कुंदा या दोघींनी विज्ञान शाखेत १२ वी करून नर्सिग कोर्स पूर्ण केला आहे. या दोघीही कोल्हापूर सीपीआर ला आरोग्य सेविका आहेत. पाचवा मुलगा मंजुनाथने पदवी शिक्षण पूर्ण करून हडलगे ग्रामपंचायतीत संगणक ऑपरेटर आहे. सहावी मुलगी मालाश्री वाणिज्य शाखेची पदवी घेऊन खाजगी नोकरी करत आहे. शिलाने १२ वी पूर्ण करून नर्सिंग केले आहे. आता ती आजरा भादवण येथे आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यकाची नोकरी करत आहे. सुजाताने विज्ञान शाखेची पदवी घेऊन नर्सिंग कोर्स केला आहे. सध्या ती बम्हपुरी (जि. सोलापूर ) येथील आरोग्य केंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
       एवढ्या मुलींना केवळ जन्मच दिला नाही तर त्यांचे संगोपन करून उच्च शिक्षणही दिले. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही शासनाची आर्त हाक या राठोड कुटुंबियातील गुलाब व शेवंता पती पत्नीने सार्थ केली आहे हे मात्र निश्चित.

No comments:

Post a Comment