कायदे हे लोकांच्या संरक्षणासाठीच असतात - दिवाणी न्यायाधिश ए. सी. बिराजदार - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2021

कायदे हे लोकांच्या संरक्षणासाठीच असतात - दिवाणी न्यायाधिश ए. सी. बिराजदार

दिवाणी न्यायाधिश ए. सी. बिराजदार विधी साक्षरता जागृती कार्यक्रमात बोलताना, शेजारी इतर मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. अंतरमनाशी प्रामाणिक राहा.आयुष्याची वाटचाल सकारात्मक करायची असेल तर आज तुम्हाला झिजायला हवे. कायदे हे आपल्या संरक्षणासाठीच असतात. त्याचे पालन करा. कायदयाच्या कचाट्यातून कोणीही सुटू शकत नाही असे प्रतिपादन चंदगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधिश ए. सी. बिराजदार यांनी केले. दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेज चंदगड येथे आयोजित करण्यात आलेल्या `विधी साक्षर जागृती कार्यक्रम` शिबीरात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सौ. व्ही. आर. बांदिवडेकर होत्या.
         प्रारंभी राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती  निमित्त  फोटो पूजन करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. सौ. एम. एम. आमणगी यांनी केले. विद्या संकुलाचे प्राचार्य आर. आय. पाटील यांनी स्वागत केले. या विधी साक्षर शिबीरामध्ये महिलांचे कायदेशीर हक्क याविषयी ॲड. के. जे. नाकाडी यांनी मार्गदर्शन केले. सरकारी अभियोक्ता एस. व्ही. भादुले यांनी बालकांचे विशेष कायदेशीर अधिकार व सवलती या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी देशाचे भविष्य निकोप आणि सदृढ करायचे असेल तर बालक महत्त्वाचे आहेत हे स्पष्ट केले. सह दिवाणी न्यायाधिश डी. एम. गायकवाड यांनी युवकांचे  सामाजिक व कायदेशीर दायित्व या विषयी मार्गदर्शन करून स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील युवक कसा होता. हे स्पष्ट करून राष्ट्राच्या बांधणीत युवकांचे स्थान व कायदेशीर दायित्व स्पष्ट केले.
     प्रमुख मार्गदर्शक दिवाणी न्यायाधिश ए. सी. बिराजदार यांनी भारताचे संविधानातील मुलभूत आधिकार व कर्तव्ये, मतदानाचा अधिकार व कर्तव्ये या विषयी माहिती देऊन न्याय हक्कासाठी भांडताना स्वतःच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण होता कामा नये. कायदा मोडण्याचा कुणी प्रयत्न करू नका असे विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
       सौ. व्ही. आर. बांदिवडेकर यांनी भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. हे स्पष्ट करून जीजामाता व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले. याप्रसंगी ड. आर. पी. बांदिवडेकर, उपप्राचार्य ए. जी. बोकडे, पर्यवेक्षक एस. जी. सातवणेकर, प्राध्यापक, अध्यापक, न्यायालयीन कर्मचारी व कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन एस. जी. साबळे यांनी केले .आभार एम. व्ही. कानूरकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment