चंदगडला महसूल मधील तीन नायब तहसीलदारासह २९ पदे रिक्त, वाचा अन्य कोणती पदे आहेत रिक्त, कामावर काय होतोय परीणाम - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2021

चंदगडला महसूल मधील तीन नायब तहसीलदारासह २९ पदे रिक्त, वाचा अन्य कोणती पदे आहेत रिक्त, कामावर काय होतोय परीणाम

कर्मचाऱ्यांवर पडतोय अतिरिक्त कामांचा भार, कामे वेळेत न झाल्यामुळे नागरिकांत नाराजी

चंदगड प्रशासकीय इमारत.


नंदकुमार ढेरे / सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

       भौगोलिक विस्ताराने मोठा असलेल्या चंदगड तालुक्यातील तहसिल कार्यालयात तीन नायब तहसीलदारासह तीन मंडलाधिकारी, चार तलाठी, पाच लिपिक, तीन शिपाई, दहा कोतवाल व एक स्वच्छक अशी २९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदामूळे उपलब्ध  कर्मचार्यावर अतिरिक्त कामांचा भार पडत आहे. कामे वेळेत न होण्यामूळे नागरिक, विद्यार्थ्यांना वेळेबरोबर आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. त्यामुळे  रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.  

      तालुक्यात वाडीवस्त्यासह १७० गावाचा समावेश आहे .तालूक्याचे ठिकाण असलेले चंंदगड  हे ठिकाण पश्चिमेला असल्याने शिवाय दळणवळणाची सोय नसल्याने कामांसाठी येणारे विद्यार्थ्यी, शेतकरी, नागरिकांना दिवस दिवस ताटकळत बसावे लागत आहे. चंदगड तहसिल कार्यालयात तीन नायब तहसीलदाराचे काम  अव्वल दर्जाचे कारकून संजय राजगोळे करत आहेत. त्यांच्या वरही अतिरिक्त कामांचा भार पडत आहे. रिक्त पदामूळे तहसिल कार्यालयातील काम वेळेत न झाल्यामुळे नागरिकांना महिनोंमहिने वाट पाहत राहावी लागत असून वेळे बरोबर आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. जूने दस्त, कागदपत्रे काढण्यासाठी तर सहा-सहा महिने वाट पहावी लागत आहे. "सरकारी काम आणि सहा महिने थांब " या म्हणीची प्रचिती सध्या चंदगड तालुक्यातील नागरिकांना तहसिल कार्यालयात अनुभवायल  मिळत आहे. त्यामुळे चंदगड तहसिल कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

चंदगड तहसिल कार्यालयात महसूल खात्याने पंधरा दिवसापूर्वी एन एस गायकवाड  यांची पदोन्नतीने नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती केली आहे. पंधरा दिवस उलटून गेले तरी अद्याप गायकवाड यांनी नायब तहसीलदार पदाचा  कार्यभार स्विकारला नाही. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन दूस-या नायब तहसीलदारांची नेमणूक करावी अथवा कार्यालयातील वरिष्ठ कर्मचार्याकडे तरी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार द्यावा अशी मागणी होत आहे.  

चंदगड तहसील कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरावीत यासाठी सचिवाकडे मागणी केली आहे. आठ दिवसात हि रिक्त पदे भरली नाहीत तर मुख्यमंत्र्याची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.



No comments:

Post a Comment