चंदगड तालूक्यातील प्रवाशांवर गडहिंग्लज एसटी डेपोचा अन्याय , गडहिंग्लज जोमात तर चंदगड कोमात, वाचा सविस्तर....... - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2021

चंदगड तालूक्यातील प्रवाशांवर गडहिंग्लज एसटी डेपोचा अन्याय , गडहिंग्लज जोमात तर चंदगड कोमात, वाचा सविस्तर.......

गडहिंग्लज बस डेपोमध्ये लावण्यात आलेला फलक

तेऊरवाडी / एस. के. पाटील

         गडहिंग्लज एसटी आगाराने गडहिंग्लज आगारामध्ये एक फलक लावला आहे. या फलकावर चंदगड आगाराच्या चंदगड - कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या एसटी बस बडयाचीवाडी, काळभैरी, हडलगे फाटा, बुगटे आलूर, राशिंगे, शिप्पूर, तवंदी, निपाणी, कागल या ठिकाणी थांबवण्याचा आदेश दिला आहे. गडहिंग्लजच्या गाड्या मात्र विना थांबा, विना वाहक अन चंदगडच्या मात्र थांबंत-थांबत जातात. यामुळे चंदगडच्या प्रवाशांना कोल्हापूरला जाण्यासाठी चार तास लागत आहेत. त्यामुळे चंदगड आगाराच्या उत्पन्नातही घट होत आहे. सध्या मात्र गडहिंग्लज डेपोच्या शकूनी काव्याने गडहिंग्लज डेपो जोमात तर चंदगड डेपो कोमात अशीच काहीशी अवस्था आहे.

      चंदगडहून कोल्हापूरला एकही विनाथांबा बस धावत नाही. मात्र कोल्हापूरला धावणाऱ्या बसमधून थेट चंदगड वरून कोल्हापूरला प्रवाशी प्रवास करतात. या प्रवासासाठी या अगोदर अडीज ते तीन तास तास लागायचे. पण आता बस सर्व थांब्यावर थांबवण्याचा फलक लावल्याने चंदगडच्या प्रवाशाला कोल्हापूर पोहचायला चार तास लागत आहेत. त्यामूळे चंदगडच्या प्रवाशांवर हा अन्यायच आहे. याचा परिणाम म्हणून चंदगडचे प्रवाशी गडहिंग्लजला जात आहेत. तेथून गडहिंग्लज डेपोच्या विना थांबा बसमधून कोल्हापूरपर्यंत प्रवास करत आहेत.  

          साहजिकच गडहिंग्लज डेपोचे उत्पन्न वाढत आहे तर चंदगडचे कमी होत आहे. गडहिंग्लज डेपोमध्ये चंदगडच्या गाडयामध्ये पासधारक विद्यार्थी बसविण्यासाठी खास कर्मचारी नियुक्त केल्याचे समजते. म्हणजे गडहिंग्लज डेपो पासचे पैसे घेणार आणि फ्री विद्यार्थी वाहतूक मात्र चंदगड डेपोच्या गाडीतून करणार. याचा संपूर्ण लाभ गडहिंग्लज डेपो उचलत आहे. त्यामूळे गडहिंग्लज डेपोचे उत्पन्न वाढून तो जोमात तर चंदगड डेपोचे उत्पन्न घटून तो कोमात जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. चंदगडच्या प्रवाशातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

No comments:

Post a Comment