किटवाड येथील अनाथ बालकांना आर्थिक मदत, कोण आहेत ही बालक? कोणी दिली मदत? - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2021

किटवाड येथील अनाथ बालकांना आर्थिक मदत, कोण आहेत ही बालक? कोणी दिली मदत?

किटवाड येथे आजी व बालकांना मदत देताना सौ. प्रेमिला बामणे, सौ. सुनिता राजगोळकर, श्रीकांत पाटील, पी. जे. मोहनगेकर आदी मान्यवर.

कोवाड : सी एल वृत्तसेवा

           आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या किटवाड, ता. चंदगड येथील कुणाल व काजल किसन बिरजे यांना कोवाड केंद्रातून १४,५००/- रुपयांची रोख मदत देण्यात आली. 

             किटवाड येथील किसन रानोजी बिर्जे यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. वृद्ध आई व मुलांसह संसाराचा गाडा ओढणाऱ्या त्यांच्या मूकबधिर पत्नीचे दोन महिन्यापूर्वी अपघाती निधन झाल्यामुळे दोन्ही मुले पोरकी झाली. त्यांच्या भवितव्यासाठी किसन चे मुळगाव कालकुंद्री तसेच समाजातील अनेक दानशूर व्यक्तींकडून विविध स्वरूपात मदत मिळाली. तथापि वारंवार आजारी पडणाऱ्या काजलच्या उपचारासाठी आर्थिक गरज पाहून कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै पाटील यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शिक्षक व समाजातील अन्य व्यक्तीनींही मदत केली. जमा झालेली  रक्कम किटवाड येथे आजीच्या स्वाधीन करण्यात आली.

              यावेळी कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, तेऊरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रेमिला बामणे, अध्यापिका सौ सुनिता राजगोळकर, कुणालला शिक्षणासाठी दत्तक  घेतलेली शाळा जयप्रकाश विद्यालय किणी चे मुख्याध्यापक पी जे मोहनगेकर, जयवंत राजगोळकर, किटवाड शाळेचे मुख्याध्यापक वैजनाथ अष्टेकर, शिक्षक के जे पाटील व श्रीकांत तारीहाळकर उपस्थित होते. याकामी विभागीय वन अधिकारी भरत पाटील कोल्हापूर, शिक्षण विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे, कागणी हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. जे. देसाई, तेऊरवाडी शाळेचे अध्यापक आनंदा पाटील, किणी शाळेचे अध्यापक आप्पाराव पाटील, ए. के. पाटील, अध्यापिका मंगल सुनील पाटील, सुजाता रवींद्र पाटील आदींचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment