गारगोटी पाटगाव रस्ता प्रश्नी संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा, नियमबाह्य रस्ता रुंदीकरणाचा घाट - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2021

गारगोटी पाटगाव रस्ता प्रश्नी संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा, नियमबाह्य रस्ता रुंदीकरणाचा घाट

तहसिलदार अश्विनी वरुटे यांना निवेदन देताना भुदरगड संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते. 

गारगोटी : सी एल वृत्तसेवा

    गारगोटी ते पाटगाव रस्त्याचे विस्तारीकरण नियमानुसार न झाल्यास भुदरगड तालुका संभाजी ब्रिगेडने तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

   भुदरगड तालुका व गारगोटी परिसराला सोनवडे घाटातून कोकणला जोडणाऱ्या गारगोटी ते पाटगाव ह्या सुमारे तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होणार आहे. आतापर्यंत योग्य रितीने सुरू असलेल्या कामात काही गावांमध्ये रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर हस्तक्षेप सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

     सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला सहा मीटर असा एकूण बारा मीटर रुंदीचा रस्ता अपेक्षित असताना रुंदी त्यापेक्षा अधिक वाढविण्यासाठी हस्तक्षेप व दबाव आणला जात आहे. यामुळे रस्त्याकडेला वर्षानुवर्षे छोटे मोठे व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या व्यावसायिकांवर गंडांतर येणार आहे. हे टाळण्यासाठी संभाजी ब्रिगेड भुदरगडच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम शासनाच्या नियमानुसार व्हावे अशी विनंती करणारे निवेदन तहसीलदार अश्विनी वरुटे यांना सादर केले आहे. नियमबाह्य  रुंदीकरणाचा प्रयत्न झाल्यास तो संभाजी ब्रिगेड हाणून पाडेल व याप्रश्नी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी सुधाकर देसाई, मानसिंग देसाई, भिमराव देसाई, स्वप्नील सुपल, सुनील देसाई,बंटी यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment