मोरेवाडीत माजी सैनिकाचा निवृत्तीनिमित्य सत्कार, गावामध्ये काढली भव्य मिरवणूक - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2021

मोरेवाडीत माजी सैनिकाचा निवृत्तीनिमित्य सत्कार, गावामध्ये काढली भव्य मिरवणूक

                                            सैनिक चंद्रकांत घेवडे यांचा सत्कार करताना लक्ष्मण कुराडे व इतर. 

अडकूर /सी. एल. वृत्तसेवा

           सैनिक हेच भारत देशाचे आण ,बाण आणि शान आहेत. सैनिकाचा सर्वाना अभिमान असायलाच हवा. हिच आदराची भावना मोरेवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थानी आज दाखवून दिली. भारतीय सैन्यदलातून २४ वर्षे यशस्वीपणे सेवा बजावून निवृत्त झालेल्या चंद्रकांत पांडूरंग घेवडे या सैनिकाचा भव्य सत्कार समारंभ मोरेवाडी ग्रामस्थांनी केला. यावेळी संगीताच्या तालावर सैनिक चंद्रकांतवर फुलांचा वर्षाव करत मिरवणूक काढण्यात आली.
         मोरेवाडी या डोंगराळ गावातील युवक चंद्रकांत  १० वी नंतर १९९७ साली ४ मराठा बटालियनमध्ये बेळगाव येथे भरती झाला. यानंतर जम्मू, सिकंदराबाद, फिरोजपूर, पठाणकोट अशा ठिकाणी सेवा बजावून भारतमातेचे रक्षण करून हवालदार या पदावरून निवृत्त झालेल्या चंद्रकांत यांची गावातून सवाद्य मिरवूणूक काढण्यात आली. संपूर्ण गल्यामध्ये रांगोळीचा सुंदर असा सडा टाकण्यात आला होता. गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते तसेच लक्ष्मण कुराडे, शिवशक्ती हायस्कूल अडकूरच्या वतीने एस. के. पाटील आदिनी जवान चंद्रकांत यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सिमेवर अहोरात्र जागणारे व देशाचे रक्षण करणारे जवान असल्याने देश सुरक्षित आहे. अशा साऱ्या जवानांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे मनोगत लक्ष्मण कुराडे यांनी व्यक्त केले. तर ग्रामस्थांच्या सत्काराने मी पूर्ण भारावून गेलो असून देशसेवा तर केली आहेच, पण आता गाव सेवा करणार असल्याचे मनोगत सैनिक चंद्रकांत यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
        यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. शितल घेवडे, दूध संस्था चेअरमन चंद्रभागा कुराडे, डे. सरपंच मल्लू गावडे, श्री. मेघुलकर, कृष्णा पारखे, लक्ष्मी कुराडे, शुभांगी कुराडे, माजी सैनिक विठोबा गावडे, निवृत्ती तीबिले, केदारी पाटील, रामू घेवडे, पांडूरंग घेवडे, पुंडलिक घेवडे आदि मान्यवर व  ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment