शाळाबाह्य, स्थलांतरित मुलांच्या सर्वेक्षणासाठी कोवाड येथे कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2021

शाळाबाह्य, स्थलांतरित मुलांच्या सर्वेक्षणासाठी कोवाड येथे कार्यशाळा

 

कोवाड (ता. चंदगड) येथे मार्गदर्शन करताना बीआरसी विषयतज्ञ महादेव नाईक, सोबत डी. आय. पाटील, वाय. व्ही. कांबळे.

 कोवाड : सी एल वृत्तसेवा

     महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासंबंधी होणाऱ्या सर्वेक्षणाची प्रशिक्षण कार्यशाळा श्रीराम विद्यालय कोवाड येथे नुकतीच संपन्न झाली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख डी. आय. पाटील होते.

     स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य वाय. व्ही. कांबळे यांनी केले. बीआरसी पंचायत समिती चंदगड चे विषय तज्ञ महादेव नाईक व केंद्रप्रमुख यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित कोवाड, कालकुंद्री, कुदनूर, माणगाव या चार केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. दिनांक १ ते १० मार्च पर्यंत चालणाऱ्या विशेष सर्वेक्षण मोहिमेत प्रत्येक गावातील कुटुंबांची सर्वसाधारण माहिती, सोबत ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळा शाळाबाह्य, स्थलांतरित होऊन गेलेल्या व स्थलांतरित होऊन आलेल्या बालकांच्या नोंदीचे प्रपत्र यात माहिती संकलित केली जाणार आहे. या मोहिमेत सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व बालरक्षक यांचा सहभाग राहणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक राज्यात ऊसतोडी सह वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजुरी, बांधकाम व सार्वजनिक बांधकाम आदींच्या निमित्ताने  कुटुंबाबरोबर स्थलांतरित होणाऱ्या बालकांचा समावेश असेल.

        यावेळी चंदगड तालुका सर्व संघटना समन्वय समितीचे सदस्य गोविंद पाटील यांनी शिक्षकांच्या विविध मागण्या बाबत मार्गदर्शन केले. कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी आभार मानले. या कामी गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार व विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment