तिलारी घाटात कंटेनर अडकल्याने पाच तास वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल, अवजड वाहनांवर बंदी घालण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2021

तिलारी घाटात कंटेनर अडकल्याने पाच तास वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल, अवजड वाहनांवर बंदी घालण्याची मागणी

तिलारी घाटात वळणावर अडकून पडलेला मालवाहू कंटेनर.

दोडामार्ग / सी. एल. वृत्तसेवा

        दोन दिवसापूर्वी तिलारी दोडामार्ग घाटात अवजड मालवाहू कंटेनर वळणावर अडकल्यामुळे घाटातील वाहतूक पाच ते सहा तास ठप्प झाली. यात प्रवासी व वाहनधारक यांचे अतोनात हाल झाले. वारंवारच्या अशा घटना थांबवण्यासाठी येथील अवजड वाहतुक चंदगड व दोडामार्ग पोलिसांनी बंद करावी अशी मागणी होत आहे.

   कोल्हापूर, बेळगाव आदी मोठ्या शहरांना गोव्याशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून  तिलारी- दोडामार्ग घाटाकडे पहिले जाते. घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास कर्नाटकातून गोव्याकडे जाणारा मालवाहू कंटेनर ट्रक हा धोकादायक घाट उतरत असताना  वळणावर  अडकून पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. जवळचा मार्ग म्हणून प्रथमच येणाऱ्या चालकाची धोकादायक घाट पाहताच भंबेरी उडाली होती. 

मोटार सायकल जाण्यास देखील रस्ता नसल्याने दोन्ही बाजूस एसटी सह शेकडो वाहने अडकून पडली. अखेर जेसीबी मशीनने कंटनेर कसाबसा बाजूस सरकवून मार्ग मोकळा केला.

    रविवार व पहाटेची वेळ असल्याने भाजीपाला घेऊन जाणारी वाहने, कोल्हापूर, बेळगाव कडे जाणाऱ्या व दोडामार्ग, गोव्याकडे येणारी बस वाहतूक, तसेच गोवा, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मुंबई, येथील अनेक पर्यटकांची वाहने घाटात अडकून पडली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

     घटनेची माहिती दोडामार्ग व चंदगड पोलिसांत देऊन चार तास झाले तरी कुणी न आल्याने प्रवासी व वाहनधारकांना तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक पूर्ववत झाली. याकामी विजघर येथील दत्ताराम देसाई आदींनी प्रयत्न केले.

     तिलारी घाटातून वाहतूक बंद असल्याचे समजताच काही वाहने मोर्ले ते पारगड किल्ला मार्गे तर काही आंबोली  व चोर्ला घाट मार्गे गेली. तिलारी घाट पायथ्याशी जलसंपदा विभागाने लावलेला अवजड वाहनांना प्रवेश बंदी फलक कुचकामी ठरत असून अवजड वाहने याच मार्गाचा अवलंब करत आहेत.  नवीन चालकांना अंदाज नसल्याने अनेक वेळा अपघात घडतात अशा वेळी शेकडो वाहने नाहक अडकून पडतात. त्यामुळे संबंधित पोलीस खात्याने अशा वाहनांना प्रवेश बंद करून त्यांना अन्य मार्गाने जाण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment