कोवाड येथील एसबीआय एटीएम मशीन बद्दल वाढत्या तक्रारी - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2021

कोवाड येथील एसबीआय एटीएम मशीन बद्दल वाढत्या तक्रारी

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

      कोवाड (ता. चंदगड) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वारंवार बंद पडणाऱ्या एटीएम मशीन बद्दल ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

        कोवाड हे चंदगडच्या पूर्व परिसरातील चाळीस-पन्नास गावांचे मध्यवर्ती व बाजारपेठेचे ठिकाण असून निटूर रोड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार काही वर्षापूर्वी बँकेलगत एटीएम मशीन बसवण्यात आले आहे. तथापि ग्राहकांच्या मागणीनुसार येथे कधीच पैसे उपलब्ध नसतात. गेल्या महिन्यापासून तर मशीनच बंद आहे. त्यामुळे मशीनवर अवलंबून असलेल्या ग्राहकांची मोठी कुचंबणा होत असून सुविधेऐवजी असुविधाच वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे मुळातच ग्राहक भरडला गेला आहे. सध्या कोरोना प्रकोप कमी झाल्यामुळे यात्रा, साखरपुडे, लग्न समारंभ, घरांची बांधकामे आदी गतीमान झाल्याने पैशांची गरज वाढली आहे. बँकांतील गर्दी टाळण्यासाठी बहुतांशी ग्राहक एटीएमचा वापर करतात. तथापि नेहमी नादुरुस्त मशीनमुळे भ्रमनिरास होत आहे. प्रसंगी सुट्टीच्या दिवशी किंवा रात्री-अपरात्री बेळगावला जाण्याची वेळ येत आहे. याची दखल घेऊन संबंधितांनी मशीन दोषमुक्त करून सक्षम सेवा द्यावी अशी मागणी होत आहे.



No comments:

Post a Comment