वयाच्या ऐंशीतही ते घडवतोय आकर्षक चुली, चुली बनविण्यात त्यांचा हातखंडा, कोण आहे ही व्यक्ती? वाचा सविस्तर...... - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2021

वयाच्या ऐंशीतही ते घडवतोय आकर्षक चुली, चुली बनविण्यात त्यांचा हातखंडा, कोण आहे ही व्यक्ती? वाचा सविस्तर......

हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील लक्ष्मण कुंभार चुली बनवत असताना. 

संजय पाटील, तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      देश कितीही प्रगत झाला तरीही ग्रामीण भागातील बहुतांश खेडयात आजही चूलीवरच स्वयंपाक केला जातो. वयाची ८० वर्ष पार केलेल्या हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील लक्ष्मण सुभाना कुंभार हि व्यक्ती गेल्या ६० वर्षापासून अविरतपणे याच मातीच्या चुली बनवून हजारो कुटुंबांच्या घराघरात अत्यल्प किमतीत पोहचवल्या आहेत.

    सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातही गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. तरीही सध्या गॅस दर प्रचंड वाढल्याने ग्रामीण भागातील लोक पुन्हा एकदा चुलीकडे वळले आहेत. ग्रामीण भागातील जनता चुलीवर स्वयंपाक करणे पसंत करत आहे. त्याचे कारण म्हणजे अगदी सहज उपलब्ध होणारी लाकडे. गेल्या साठ वर्षापासून कुंभार हे चुली बनवण्याचा व्यवसाय करतात. यामध्ये एक सुवाला असलेली, दोन सुवाले असलेली निर्धूर चूल अशा विविध चुली परिसरात मिळणाऱ्या शाडू मातीपासून बनवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. नेसरी, कोवाड परिसरासह गडहिंग्लज, आजरा, चंदगडसह  कर्नाटकातील बेळगाव, हुक्केरी आदी तालुक्यांमध्ये त्यांच्या चुलींना मोठी मागणी आहे. लक्ष्मण केवळ चुलीच बनवत नसून गेल्या सहा दशकांमध्ये गणपतीच्या आकर्षक मूर्ती, मातीची गाडगी, खापऱ्या, पाष्ट बनवण्यामध्येही ते तरबेज आहेत.  बरोबरच मातीच्या विटा बनवण्याचा व्यवसायही ते करतात. सर्वत्र गॅस सिलेंडरचे वर्चस्व वाढत असतानाही गॅसच्या वाढत्या महागाईमुळे पुन्हा लोक चूलीकडेच वळत असल्याचे लक्ष्मण याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

         या पूर्वी या चूली, गाडगी,  खापऱ्या  धान्य घेऊन दिले जायचे. पण आता धान्य कोण देत नसून त्या बदल्यात पैसे देतात, सध्या महागाई वाढली असली तरी ही अत्यंत कमी किमतीत चुली विक्रीचा व्यवसाय ते करत आहेत. याकामी त्यांना मुलगा व सुन सहकार्य करतात. एकंदरीत या चुलींच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचले असून मी बनवलेल्या चुलीवर स्वयंपाक केला जात असल्याने मला समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment